संस्थान आचरे गावच्या डाळपस्वारी ची उत्साहात सांगता

पहाटेही भाविकांचा उसळला होता जनसागर

आचरा,दि.०८ फेब्रुवारी (अर्जुन बापर्डेकर)
मध्यरात्री निघालेल्या श्रींच्या स्वारीची पारवाडी ब्राम्हणदेव स्थानाकडून मुळ स्थानाकडे येण्याची आस वाढली होती.झुलव्याची लय वाढत होती.तरंगांचे लयीवर पाय थिरकत होते.शाही लवाजम्यासह वाटेतील भाविकांची गा-हाणी, अडीअडचणी जाणून घेत शनिवारी पहाटे रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालत धावतच निघालेले अवसर गांगेश्वर मंदिरात येत प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत विसावले.तीन वर्षानी बोलणारया काळकाय देवीचे अभिवचन कानात साठविण्यासाठी भाविकांनी पहाटेपर्यंत गर्दी केली होती.
दोन फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संस्थान आचरे गावच्या डाळपस्वारीची हजारो भाविकांच्या साक्षीने शनिवारी पहाटे सांगता झाली.
श्री देव गिरावळ पूर्वी आकार येथून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारासअंतिम परीक्रमेला सुरुवात झाली आचरा बाजारपेठ येथे बाजारपेठ वासिय,व्यापारी बांधवांकडून श्रींच्या स्वारीचे मोठ्या उत्साहात स्वागत सुरू झाले होते आदर्श व्यापारी संघटना आचरा, रिक्षा संघटना, टेम्पो चालक मालक ,तसेच ग्रामस्थांनी श्रींच्या स्वारीचे जल्लोषात फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले होते. व्यापारी मंडळातर्फे दुपारी भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती सुमारे पाच हजाराच्या वर भाविकांनी याचा लाभ घेतला फुरसाई मंदिर येथे संजय घाडी मित्र मंडळ आणि बाबू परुळेकर मित्र मंडळाकडून शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.डाळपस्वारी फेरीच्या वाटेवर ठीक ठिकाणी ग्रामस्थांतर्फेआईस्क्रीम खाद्यपदार्थांची व्यवस्था केली गेली होती.भर दुपारी उन्हाची तमा न बाळगता सुमारे पाच हजारांच्या वर भाविक या डाळपस्वारीत सहभागी झाले होते.मावळत्या सुर्याच्या साक्षिने भाविकांची गा-हाणी ऐकत ओट्या स्विकारत श्रींची स्वारी नागोचीवाडी ब्राह्मण देव येथे काही काळ थांबून पारंपरिक वाटेने पुढे रात्री पारवाडी येथील डाळप करत ब्राह्मण देव मंदिर येथे काही काळासाठी थांबली होती.पारवाडी ग्रामस्थांकडूनही महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.मध्यरात्रीनंतर दिंड वाजण्याच्या सुमारास पुन्हा पारवाडी येथून पारवाडी,डोंगरेवाडी ग्रामस्थांच्या ओट्या स्विकारत स्वारी पुजारेवाडी देवूळवाडी, मेस्त्रीवाडी,डोंगरेवाडी ग्रामस्थांची गा-हाणी ओट्या स्विकारत पहाटे रामेश्वर मंदिर येथे दाखल झाली होती.झुलव्याची लय वाढत होती.आस वाढली होती.रामेश्वर मंदिर महास्थानाला भेट देत प्रदक्षिणा घालत धावत गांगेश्वर मंदिराकडे आली होती. गेले सहा दिवस सुरू असलेल्या डाळपस्वारीची शनिवारी पहाटे सांगता झाली. डाळपस्वारी व्यवस्थेवर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप परब मिराशी, सचिव संतोष मिराशी,साॅलिसिटर शिल्पन गांवकर यांसह सर्व सहकारी,बारापाच मानकरी सहभागी होत लक्ष ठेवून होते.अभय राणे कुटुंबीयांकडूनही संपूर्ण डाळपस्वारीत डाळपस्वारी वाटेवर रेड कार्पेट सुविधा दिली जात होती.आरोग्यविभागाकडूनही आरोग्य सुविधेसाठीपथक तैनात केले होते.
डाळपस्वारीत कुणकेश्वर देवस्थान,साळशी,कोटकामते पदाधिकारी समिती सदस्य, मानकरी यांनी सदिच्छा भेट दिली होती.देवस्थान पदाधिकारी तसेच बारापाच मानकरयांनी त्यांचा यथोचित सन्मान केला होता.
संस्थान आचरे जोपासतेय प्राचिन परंपरा -अध्यक्ष प्रदिप . मिराशी
याबाबत माहिती देताना देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप परब मिराशी सांगतात
सर्वात प्राचीन अशीही डाळपस्वारी परंपरा संस्थान आचरेगावात आजच्या युगातही त्याच तन्मयतेने आचरा वासिय जोपासत आहेत.अशी भव्य दिव्यता,शाहीथाट इतरत्र कुठेही दिसून येत नाही.ग्रामस्थांची तनमनथन अर्पूण होणारी समरसता भावणारी आशीच आहे.