कांदळगाव श्री देव रामेश्वर देवस्थानचा चतु:सीमा (वेशी फिरणे) कार्यक्रमास दुपारपासून सुरुवात…

मालवण,दि.०९ फेब्रुवारी 
मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा पूर्वांपार परंपरेनुसार स्वयंभू देव रामेश्वर पालखी, तरंग, राणे – परब मानकरी व रयत मंडळीसह चतु:सीमा (वेशी फिरणे) कार्यक्रमास आज दुपारपासून सुरुवात झाली. कांदळगाव येथील रामेश्वर मंदिर येथून श्री देव रामेश्वराने पालखीत बसून देव तरंग, राणे – परब व रयतेसह वेशी फिरणे कार्यक्रमासाठी प्रस्थान केले. देवाच्या स्वागतासाठी कांदळगाव तसेच ओझर ते कोळंब यां मार्गावर भाविकांनी भव्य रांगोळ्या काढल्या होत्या तसेच रस्त्याच्या दुतर्फा भगवे ध्वज फडकवत गुढ्या देखील उभारल्या होत्या.

श्री देव रामेश्वर मंदिरातून सायंकाळी प्रस्थान केल्यावर आपल्या मार्गावर भाविकांचे ठिकठिकाणी स्वागत स्वीकारत श्री देव रामेश्वर ओझर नाक्यावर दाखल झाल्यावर त्याठिकाणी भाविकांकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर कोळंब खडवण नाका येथेही भाविकांकडून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. या दरम्यान मार्गावर भाविकांना शीतपेय व लाडू तसेच अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी श्री देव रामेश्वराने कोळंब मांगरी येथे भेट दिली. याठिकाणीही भाविकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

या सोहळ्यात उद्या दि. १० फेब्रुवारी रोजी कोळंब मांगरी येथील देव महापुरुष येथे दुपारी महाप्रसाद, दुपारनंतर न्हिवे येथे प्रस्थान करणार आहे. दि. ११ रोजी न्हिवे येथे दुपारी महाप्रसाद, दुपारनंतर महान येथे प्रस्थान, १२ रोजी दुपारी महान गांगेश्वर मंदिर येथे महाप्रसाद, दुपारनंतर कांदळगाव रवळनाथ मंदिरकडे प्रस्थान, १३ रोजी सकाळी रवळनाथ मंदिरातून कांदळगाव साळकरवाडी येथे प्रस्थान, तेथून पुन्हा माघारी येताना परबवाडी मोठ्या तुळशीजवळ महाप्रसाद, दुपारनंतर रवळनाथ मंदिराकडे प्रस्थान, १४ रोजी रवळनाथ मंदिर येथून राणेवाडी येथे प्रस्थान, दुपारी राणेवाडी मध्यवर्ती मोठी तुळस येथे महाप्रसाद, दुपारनंतर रामेश्वर मंदिर येथे रवाना, रात्री रामेश्वर मंदिर येथे पाच दिवसीय वेशी फिरणे कार्यक्रमाची रितीरिवाजानुसार सांगता करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन कांदळगाव रामेश्वर देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.