सावंतवाडी,दि.१० फेब्रुवारी
शिरोडा (सिंधुदुर्ग) येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयातर्फे शनिवार दि.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० ते संध्याकाळी ०६.०० या वेळेत ‘मराठी शुद्धलेखनाचे साधे-सोपे नियम’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
नियमितपणे किंवा अधूनमधून मराठीत काहीना काही लिहिणाऱ्यांनी शुद्धलेखनाचे नियम एकदा लक्षपूर्वक समजून घेतले तर सहज लक्षात राहतात. म्हणून मराठी लिहिताना सर्वसामान्यपणे केल्या जाणाऱ्या चुकांसंदर्भात चर्चा करून शुद्धलेखनाचे साधे-सोपे नियम समजून घेणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.
गोव्यातील साहित्यिक तथा निवृत्त प्राचार्य गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील.
नि:शुल्क असलेली ही कार्यशाळा प्रामुख्याने मराठी प्राथमिक शाळांमधील शिक्षक,तसेच माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळांमधील मराठी विषयाचे शिक्षक यांच्यासाठी आयोजित करण्यात आली असली तरी, मराठी भाषेत लेखन करणारे, तसेच अन्य मराठी भाषाप्रेमीही या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.
या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे खटखटे ग्रंथालयाच्या ग्रंथपाल अर्चना लोखंडे, तसेच साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांच्याकडे द्यावीत,असे आवाहन खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यानी केले आहे.