कष्ट केल्यास हमखास यश-डॉ.बोरफळकर

देवगड,दि.११ फेब्रुवारी

देवगड येथील शेठ म.ग .हायस्कूल येथे राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमधील विजेत्यांचा सत्कार समारंभ गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी व्यासपीठावर हायस्कूलच्या स्थानीय समितीचे अध्यक्ष डॉक्टर ख.ना .बोरफळकर, संस्थेचे सचिव ॲड. अविनाश माणगावकर, खजिनदार दत्तात्रय जोशी, माजी मुख्याध्यापक व स्थानीय समिती सदस्य चंद्रकांत शिंगाडे, स्थानीय समिती सदस्य अनुश्री पारकर, मुख्याध्यापक महादेव घोलराखे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिनांक सहा व सात फेब्रुवारी रोजी अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या आणि राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या शाळेचा विद्यार्थी आराध्य विशाल चौगुले याचा संस्थेमार्फत रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविलेली वेदा शशांक साटम हिला देखील रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर भावेश उमेश वाळके याने देखील या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्याला देखील रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
‘विद्यार्थ्यांनी प्रयत्नामध्ये सातत्य ठेवल्यास व कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास तसेच पालकांचे उत्तम सहकार्य मिळाल्यास हमखास यश आपल्याला मिळविता येईल. विद्यार्थ्यांनी भविष्यात देखील असे उत्तम यश मिळवून आपले त्याचबरोबर शाळेच्या नावलौकिकात देखील भर घालावा असे मत डॉक्टर बोरफळकर यांनी व्यक्त केले.’
यावेळी या विद्यार्थ्यांचे मुख्य प्रशिक्षक गणेश वायंगणकर आणि दीप जाधव यांचा देखील संस्थेमार्फत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
माजी मुख्याध्यापक व स्थानीय समिती सदस्य चंद्रकांत शिंगाडे यांनी या तीनही खेळाडूंसाठी रोख रकमेची पारितोषिके प्रदान केली.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक महादेव घोलराखे यांनी तर निवेदन व आभार सहाय्यक शिक्षक प्रवीण खडपकर यांनी केले.