वेंगुर्ला,दि.११ फेब्रुवारी
एका प्रसिद्ध कॉलेजच्या गेटटुगेदरप्रसंगी आलेल्या माजी विद्यार्थ्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला तत्काळ नजिकच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, तेथील तज्ज्ञ डॉक्टर्स व परिचारिका यांनी त्वरित उपचार यंत्रणा राबवित संबंधित माजी विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आणण्यात यश मिळविले. रूग्णालयाने केलेल्या यशस्वी उपचाराबाबत उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपचार करणारे डॉक्टर्स व परिचारिका यांचे तोंडी आभार मानलेच परंतु, रूग्णालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे पत्रही वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप सावंत यांच्याकडे सादर केले.
सरकारी रूग्णालय म्हटले की, तेथील अपु-या सोयीसुविधांमुळे रूग्ण उपचार घेण्यास नकार देतात अशी चर्चा ऐकायला मिळते. परंतु, वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालय मात्र, येणा-या रूग्णांवर तातडीने आणि योग्य ते उपचार करीत सेवासुविधा पुरवित आहेत. ७ फेब्रुवारी रोजी एका प्रसिद्ध कॉलेजच्या गेटटुगेदरसाठी समुद्रकिनारी मित्रमैत्रिणी एकत्र आले होते. ऐन गप्पागोष्टी, मौजमजा रंगात येत असतानाच एका माजी विद्यार्थ्याचा रक्तदाब आणि रक्तशर्करेचे प्रमाण वाढले. अत्यवस्थ झालेल्या या माजी विद्यार्थ्याला उर्वरित मित्रांनी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. दाखल करताना प्रत्येकाच्या मनात तेथील उपचाराबाबत साशंकता निर्माण होत होती. परंतु, रूग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांनी कार्यतत्परतेने केलेल्या उपचाराने संबंधित रूग्णाची प्रकृती स्थिर झाली. मित्राचे प्राण वाचविल्याबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.