कोकणात स्वतंत्र केंद्रीय विद्यापीठ झालं पाहिजे -माजी कुलगुरू डॉ.वि.ल. धारूरकर..

कोकण इतिहास परिषदेच्या तेराव्या राष्ट्रीय अधिवेशन

कणकवली दि.११ फेब्रुवारी(भगवान लोके)

एखाद्या देशाचा इतिहास पाहत असताना एखाद्या प्रदेशाच्या पटलावर कोणते प्रवाह घडतात हे समजले पाहिजे, त्यामुळे कोकण इतिहास परिषद महत्त्वाची आहे. कोकणचा इतिहास अनेक प्रदेशांचा इतिहास आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कोकणच्या इतिहासावर साधू- संतांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. कोकणच्या इतिहासासाठी इतिहासकारांना आपल्या जीवाचे रान करावे लागले आहे. कोकणचा इतिहासाचे समाजशास्त्र, मानवशास्त्र आणि नवभूमीशास्त्र जर कुठे असेल ते कोकणी माणसाच्या चिवटपणामध्ये आहे असे प्रतिपादन बीजभाषक त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.वि.ल. धारूरकर यांनी केले. त्याचप्रमाणे जर कोकणाचे भाग्य बदलाचे असेल तर कोकणात स्वतंत्र केंद्रीय विद्यापीठ झालं पाहिजे अशी मागणी डॉ. धारूरकर यांनी व्यक्त केली.

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज येथे आयोजित कोकण इतिहास परिषदेच्या तेराव्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते यावेळी कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर, कार्यवाहक डॉ. विद्या प्रभू, कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉक्टर डॉ. राजश्री साळुंखे सचिव विजयकुमार वळंजु, पनवेल उच्च शिक्षण कोकण विभागाचे सहसंचालक डॉ. संजय जगताप, मुंबई विद्यापीठाचे डॉ. प्रकाश मेसराम, कोल्हापूर अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.टी.एस. पाटील, मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.बालाजी सुरवसे, प्रकाश देशपांडे,डॉ. नारायण भोसले कणकवली कॉलेजचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, कणकवली कॉलेजच्या इतिहास प्रमुख सोमनाथ कदम, डॉ. राजेंद्र मुंबरकर आदी उपस्थित होते.
डॉ. धारूरकर म्हणाले, इतिहासाकडे पाहताना वेगवेगळ्या दृष्टीने पहावे. व्यक्ती, समाज आणि घटक यांचा परस्पराशी होणारा संवाद, समाज आणि समाज घटकांची होणारा संवाद या सर्वांना मिळून इतिहास असे म्हटले जाते असे त्यांनी सांगितले. वसाहतवादी दृष्टिकोनातून इथला इतिहास काळ बाह्य ठरला आहे ज्यावेळी १९२२ आणि २४ साली सिंधू संस्कृतीचा इतिहास मोहनजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीला लावण्यात आला ज्यावेळी जग अंधारात होते त्यावेळी भारत प्रकाशात होते असे मानण्यात आले. असे ते म्हणाले.
संजय जगताप म्हणाले, कोकणचे सांस्कृतिक इतिहास दरवर्षी अशा कार्यक्रमातून सर्वांच्या समोर ठेवला जातो. त्यामुळे तळ कोकणातील नाविन्यपूर्ण ऐतिहासिक घटना लोकांसमोर ठेवण्याचे काम या परिषदेच्या मार्फत होत आहे. पूर्वीचा इतिहास व सध्याची परिस्थिती या दोघांचा संगम करून नव्या पद्धतीने इतिहास समाजासमोर मांडला जातो हे निश्चितच समाजाला उत्तेजना देणारी बाब आहे. कारण इतिहासाचे अनुकरण करायला हवे संस्कृतीचे जतन करायला हवी. त्यामुळे या मोबाईलच्या युगात नवा पिढीसमोर संस्कृतीचा इतिहासाचा मिलाप ठेवला पाहिजे असे श्री जगताप यांनी सांगितले. कोकणाचा इतिहास हा फार मोठा आहे त्यामध्ये कोकणातून विचारवंत त्याचप्रमाणे जास्तीत जास्त भारतरत्न विजेते हे कोकणातीलच आहेत. त्यामुळे अशा ऐतिहासिक महापुरुषांचा वारसा अशाच प्रकारे पुढे चालू ठेवला पाहिजे यासाठी अशा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर आदर्शवत इतिहास मांडला पाहिजे असे मत त्यांनी मांडले.
युवराज महालिंगे म्हणाले, कोकण इतिहास ही परिषद नसून विचार मंथन आहे कारण कोकणाचा इतिहास फार मोठा आहे. हा इतिहास आपण ज्यावेळी भूतकाळामध्ये ढवळून पाहतो त्याप्रमाणे नवनवीन खजिना त्यामधून प्राप्त होतो आणि हा खजिना पुढील युवा पिढीच्या समोर ठेवला पाहिजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या अधिवेशनात डॉ. राजश्री साळुंखे, विजयकुमार वळंजू, डॉ. सदाशिव टेटविलकर, डॉ. टी. एस. पाटील, डॉ. बालाजी सुरवसे आदींनी मार्गदर्शन केले.
या अधिवेशनादरम्यान कोकण इतिहास परिषदेच्या वतीने चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार महेश तेंडुलकर यांच्या ‘गोव्यातील किल्ले’ या ग्रंथास देण्यात आले. तसेच उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार देण्यात आले. त्याचप्रमाणे कणकवली महाविद्यालयाने काढलेल्या “कनक” या आंतरविद्याशाखीय शोध ग्रंथांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाच्या सूत्रसंचालन प्राध्यापक एस आर जाधव यांनी केले तर आभार डॉक्टर बी एल राठोड यांनी मानले.