थकीत कर्जामुळे बँकेने जप्त केलेली मालमत्ता अनधिकृतपणे ताब्यात घेवून लावलेले सील व कुलूप तोडल्याप्रकरणी शिरगाव धोपटेवाडी येथील तिघांवर गुन्हा दाखल

ट्रॅक्टर दुरूस्ती व्यवसायाकरीता घेतले होते बँक ऑफ इंडियाकडून 20 लाखाचे कर्ज

देवगड,दि.१२ फेब्रुवारी 

ट्रॅक्टर दुरूस्ती व्यवसायाकरीता बँक ऑफ इंडिया शिरगाव बँकेकडून 20 लाख रूपये कर्ज घेवून ते मुदतीत न फेडल्यामुळे बँकेने जप्त केलेली मालमत्ता बेकायदेशीररित्या ताब्या घेवून त्या मालमत्तेला लावलेले सील व कुलूप तोडून सील करण्याकरीता वापरलेले साहित्य जाळून त्या मालमत्तेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिरगाव धोपटेवाडी येथील सीताराम चंद्रकांत जाधव त्यांची पत्नी सौ.पुनम व मुलगी देवयानी या तिघांविरूध्द देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.ही घटना 7 फेब्रुवारी रोजी रात्री 8.45.वा.सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शिरगाव धोपटेवाडी येथील सीताराम चंद्रकांत जाधव यांची 2018 मध्ये खाजगी ट्रॅक्टर दुरूस्ती व्यवसायाकरिता बँक ऑफ इंडिया शिरगाव कडून 20 लाख रूपये कर्ज घेतले याकरीता त्यांची शिरगाव धोपटेवाडी येथील मालमत्ता तारण ठेवली होती.मात्र कर्जाचे हप्ते न भरल्याने हे कर्ज थकीत झाले.बँकेने वारंवार नोटीसा बजावल्या मात्र थकीत कर्जाचे व्याज वाढले तरीही कर्ज फेउ न केल्याने थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेकडून अंतीम नोटीस देण्यात आली तरीही कर्जफेड न केल्याने तारण असलेल्या मालमत्तेवर ताबा घेण्यासाठी बँकेने जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता.त्या अर्जानुसार जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांनी मालमत्तेवर ताबा घेण्याचा आदेश जारी केला त्यानुसार दि. 7 फेब्रुवारी रोजी नायब तहसिलदार, देवगड पोलिस निरिक्षक, शिरगाव मंडल अधिकारी व बँकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत जाधव यांनी बँकेला तारण ठेवलेली शिरगाव धोपटेवाडी येथील मालमत्ता सील करण्यात येवून ताबा घेण्यात आला.बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेमध्ये त्याच दिवशी रात्री 8 वा.सुमारास अनधिकृतपणे प्रवेश करून मालमत्तेला लावलेले कुलूप तोडून व सील करण्याकरीता वापरलेले साहित्य जाळून सीताराम चंद्रकांत जाधव त्यांची पत्नी सौ.पुनम सीताराम जाधव व मुलगी देवयानी या तिघांनीही जप्त मालमत्तेमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून आतमध्ये वास्तव करून बेकायदेशीररित्या ताबा ठेवला अशी फिर्याद बँक ऑफ इंडिया लघु व मध्यम उद्योग मुख्य कार्यालय कुडाळ येथील मुख्य व्यवस्थापक ब्रजेश कांतवीर मल्लीक यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरूध्द भारतीय न्याय संहिता 223, 329(2), (3) (4), 232 सी, 334(1), 356(2),61(2), 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस उपनिरिक्षक महेश देसाई करीत आहेत.