ऑन काॅल रक्तदात्यांनी पुन्हा एकदा तीन रुग्णांना दिले जीवनदान

सावंतवाडी,दि.१४ फेब्रुवारी
ऑन काॅल रक्तदाता संघटनेच्या वतीने गंभीर विविध आजारांवरील रुग्णांना रक्ताची गरज असते तेव्हा रक्तदाते रुग्णांना रक्तं देण्यासाठी धावतात,असाच जीवदान देण्यासाठी रक्तदात्यानी धाव घेतली.

गेल्या चार-पाच दिवसांत अशाच वेगवेगळ्या प्रसंगी रक्तदात्यांनी धावतपळत जाऊन रक्तदान करुन तीन रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. सर्वप्रथम सांगेली ता. सावंतवाडी येथील सुप्रिया सुनिल राऊळ या पेशंटला लाईफटाईम हाॅस्पिटल, पडवे-कसाल येथे ह्रदयशस्त्रक्रियेसाठी चार फ्रेश रक्तदात्यांची तातडीची गरज भासली. यासाठी आॅन काॅल रक्तदाते संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर व सचिव बाबली गवंडे यांनी पाठपुरावा करताच सांगेलीहून प्रसाद परब व विठ्ठल राऊळ तर वेंगुर्ल्याचे बाबल घाटकर व सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील वित्तीय अधिकारी रोहीत पावरा या चौघांनी तातडीने एस् एस् पी एम् पडवे रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले.
कोलगाव-निरुखे येथील अपघातग्रस्त महिला उज्ज्वला उमेश राऊळ या फ्रॅक्चर झालेल्या दूर्मिळ ओ निगेटीव्ह रक्तगटाच्या पेशंटसाठी सांगेलीचे पंढरी सावंत यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरीत जीएमसी बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. या पोस्टसाठी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दिनेश गावडे, समूहसदस्य प्रसन्ना पटवर्धन व सुहास गावडे यांनी प्रयत्न केले. अन्य एका घटनेमध्ये जीएमसी बांबोळीमध्ये डेगवे ता. सावंतवाडी येथील सत्यवान वराडकर या रुग्णाला बायपास शस्त्रक्रियेसाठी फ्रेश रक्ताची आवश्यकता असताना सदर पोस्ट संस्थेचे आॅन काॅल रक्तदाते चिंतामणी खोत व समूहसदस्य आत्माराम गवस यांनी सदर पोस्ट समूहावर पाठविताच संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर यांनी सदर पोस्टचा यशस्वी पाठपुरावा केला व त्यांच्यामार्फत सांगेलीचे समीर सावंत, सतीश जोशी, ओंकार धुरी व कारीवडे येथील सिद्धेश केदार आदि रक्तदात्यांनी ताबडतोब जीएमसी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले.
सर्व तीनही पेशंटच्या नातेवाईकांनी आॅन काॅल रक्तदाते संस्थेसहीत समयसुचकता दाखविलेल्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आहेत.
योग्य वेळेवर पाठपुरावा करुन रुग्णांना जीवनदान देणार्‍या रक्तदात्यांना संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस व कार्यकारिणीने धन्यवाद दिले आहेत. अशा या आॅन काॅल रक्तदात्यांच्या जीवावरच ही संस्था प्रगतीपथावर असून या रक्तदात्यांच्या जिवित्वाची हमी म्हणून त्यांच्यासाठी ग्रुप इन्श्युरन्स सुरु केला आहे व रक्तदात्यांना सहाय्य केले आहे, तसेच भविष्यात नवनवीन संकल्पना संस्था अमलात आणणार आहे, असे मनोगत संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी व्यक्त केले आहे.