नगरसेवक तथा बांधकाम सभापती -उदय मांजरेकर
कुडाळ,दि.१५ फेब्रुवारी
कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी आम्हा नगरसेवकांवर शिंतोडे उडविण्यापेक्षा त्यांनी आपला व्यवसाय जाहीर करावा असे खुले आव्हान नगरसेवक उदय मांजरेकर यांनी केले.
आज पत्रकार परिषदेत राजन नाईक यांनी आमचा भाजपा प्रवेश स्वतःच्या स्वार्थासाठी असा आरोप केला. यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मांजरेकर म्हणाले की, राजन नाईक यांचा आतापर्यंत व्यवसायच कळलेला नाही. माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्ता जगविण्यासाठी जो फंड दिला त्यावर म्हणजे केलेल्या रस्ताच्या कामांवर पैसे काढणे व टक्केवारी घेणे ही तर एक पैसा कमविण्याची सोपी पद्धत राजन नाईकांची होती. तसेच कुडाळ प्रांत माजी वंदना खरमाळे यांची जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे परमार प्रकरणात तक्रार करणे आणि नंतर त्याच संदर्भात तडजोड करणे हे आम्ही शिवसेनेत असताना बघितलेले आहे. या उलट मेलेल्या माणसांच्या टाळुवरील लोणी खाण्यात राजन नाईक यांचा हातखंडा आहे. कै. देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ कोरोना काळात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या सौजन्याने मोफत जेवण व्यवस्था केली. त्यावेळी कडधान्य, तांदूळ हे आपल्या घरात भरण्याचे काम राजन नाईक यांनी केले असा आरोप करीत आमच्या वर स्वार्थासाठी पक्ष बदल केला म्हणून सांगणारे राजन नाईक यांनी स्वतः किती धुतल्या तांदळाचे आहेत हे आधी त्यांनी पहावे. तसेच माजी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या चुलीवर आंदण ठेऊन आपला उदरनिर्वाह करणा-या राजन नाईक यांनी आम्हाला तत्वज्ञान शिकवू नये. पुढे पुढे त्यांची सर्व प्रकारची अजून भांडाफोड आम्ही करु असे सांगून तुमची निष्ठा पक्षावर किती व नेत्यावर किती हे आम्ही जवळून पाहिले आहे. आमच्यावर तावातावाने बोलून राजन नाईक यांनी आतापर्यंत तावच मारत आले असून सत्ता असताना राणे समर्थक यांच्याकडे उबाठाचे प्रवेश चालू होते त्यावेळी नाईक हे कोणाची भांडी घासत होते? खरे तर तालुकाप्रमुख राजन नाईक असेपर्यंत कुडाळ तालुक्यातील शिवसेना अधोगतीकडे जाणार याचा संघटनेने विचार करण्याची गरज आहे असा आरोप उदय मांजरेकर यांनी केला.
तसेच नगरसेवक म्हणून माझी पात्रता होती म्हणूनच मला पक्षाने तिकीट दिले. मात्र, तालुकाप्रमुख म्हणून राजन नाईक यांची निवडून येण्याची पात्रता नव्हती म्हणून त्यांना पक्षाने तिकिटच दिले नव्हते. कायमच भैरववाडी वॉर्डमध्ये रहाणारे नाईक हे पक्षासाठी कधीही लीड देऊ शकले नाहीत हा खरा इतिहास आहे. माजी नगराध्यक्ष ओमकार तेली यांच्या कार्यप्रणालीवर व धडाकेबाज कामामुळे राजन नाईक याचे स्वार्थी राजकारण वाहून गेले असा आरोप उदय मांजरेकर यांनी केला.
आतापर्यंत पक्षाची भूमिका मांडण्यासाठी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. फक्त वैयक्तिक टीका करण्यासाठी आणि वैयक्तिक तडजोडीसाठी पत्रकार परिषद घेतली जाते असे का असा सवाल उदय मांजरेकर यांनी केला.