तळेरे,दि.११ फेब्रुवारी
आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलचे कार्य सर्वांगीण शिक्षणाला पूरक असेच असून स्तुत्य आहे. या कार्याच्या मागे मनोज गुळेकर यांचे उदार आणि सृजनात्मक योगदान असल्याचे सुप्रसिद्ध अभिनेते हार्दिक जोशी यांनी प्रतिपादन केले. नडगिवे येथे झालेल्या नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलच्या दिमाखदार स्नेहसंमेलनात ते बोलत होते.
नडगिवे यासारख्या खेड्यात शिक्षणाची होत असलेली विविधांगी शैक्षणिक सुविधा ही कौतुकास्पद आहे आणि या सुविधेचा विद्यार्थी आणि पालक यांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहनही अभिनेते हार्दिक जोशी आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री अक्षरा देवधर-जोशी यांनी केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी कांतीलाल कोथिंबीरे यांनी पालकांची मुलांबाबतची जबाबदारी प्रतिपादन करीत असतांना मुलांचे फाजिल लाड न करता त्यांच्या दैनंदिन हालचालींवर, उपक्रमांवर,वागण्यावर, संगतींवर अगत्याने लक्ष ठेवून त्यांना सुयोग्य मार्गदर्शन व कर्तव्यदक्षतेची जाणीव सतत करून देत जागृत राहण्याबाबत प्रबोधित केले.
आदर्श एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी राबवत असलेल्या उपक्रमांना विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक साथ देत असल्याबाबत समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने क्रियाशील राहण्याचे आश्वासन दिले.
नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूल आयोजित सदर वार्षिक स्नेहसंमेलनात मान्यवरांच्या सत्कारासह गुणवंत विद्यार्थी उजैर मुकादम, महेक मेमन, नील लोकरे, जिदान सारंग, सुजल महातो, महवीश मुल्ला, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विद्यालयात दहाव्या यत्तेत प्रथम आलेला शुभंकर कुबल या सर्वांचा विविध क्षेत्रातील गुणवत्तेंसाठी गौरव करण्यात आला. ज्युनिअर के.जी. ते दहावी इयत्तेंपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम विविध शैक्षणिक व सामाजिक परिपोषातून सादर करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी विद्यालयातून मिळणाऱ्या सर्वांगीण अध्ययावत शिक्षणाची प्रचिती आपल्या विविधांगी सांस्कृतिक सादरीकरणातून दर्शकांना दिली.
सदर प्रसंगी व्यासपीठावर ऑरेंज ज्यूस गॅंगचे सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धार्थ सरफरे, आदर्श एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह रघुवीर राणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीता शुक्ला यांनी केले. संदर्भ निवेदन कौस्तुभ देसाई व ओंकार गाडगीळ यांनी केले. विद्यालयाच्या प्राचार्या नीलम डांगे यांनी आभार व्यक्त केले.