फोंडाघाट,दि.१२ फेब्रुवारी(संजय सावंत)
तो खाकी वर्दी वाला आला!…आणि त्याने आपली समाजाप्रती असलेली कर्तव्याची भूमिका जीवाची पर्वा न करता चोख बजावली….सलाम त्या वर्दी ला! असे उदगार काल फोंडाघाट वासियांनी काढले. याबाबत घटना अशी, फोंडाघाट चेक पोस्ट जवळील एका हॉटेल च्या बाजूला पार्क करून ठेवण्यात आलेली कोणा अज्ञाताची मारुती 800 कार नंबर एम एच 01-एम् ए 3170 पेट घेत असल्याचे लक्षात येताच फोंडा चेक पोस्ट ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी समयसूचकता दाखवत तातडीने आपल्या जीवाशी पर्वा न करता, धोका पत्करून सावध रित्या गाडीचा दरवाजा उघडून ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याचा मारा केल्याने पुढील मोठा अनर्थ टाळला
सदरची घटना काल सायंकाळी 6.30 वा च्या दरम्याने घडली. फोंडाघाट चेक पोस्ट च्या पुढे कोल्हापूर दिशेला येथील ग्रामस्थ अशोक नानचे याच्या हॉटेल घर शेजारीच कोणा अज्ञाताने मारुती 800 कार पार्क करून ठेवली होती.या कार मधून सायंकाळी 6.30 वा दरम्याने धुर येत असल्याचे लक्षात येताच अशोक नानचे यांनी धावत जाऊन जवळच असलेल्या फोंडाघाट चेक पोस्ट वरील कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांना याची कल्पना दिली.
दरम्यान कॉन्स्टेबल बनसोडे यांनी पुढे घडणारा अनर्थ ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत गाडीमधून येणारा धूर वाढला असल्याने गाडीचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती यामुळे कोणीही ग्रामस्थ गाडी जवळ जाण्यास तयार होत नव्हता. अशावेळी प्रसंगावधान राखत पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या शिताफिने गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र बराच वेळ गाडी गरम झाल्याने यश मिळत नव्हते मात्र मोठ्या धाडसाने कॉन्स्टेबल बनसोडे यांनी दरवाजा उघडला आणि मोठा धुराचा लोंढ उसळला. ताबडतोब ग्रामस्थांच्या मदतीने स्वतः कॉन्स्टेबल बनसोडे यांनी गाडीवर पाण्याचा सातत्याने मारा करून गाडी पेटण्या पासून वाचवली.
या पेट घेणाऱ्या गाडी च्या जवळच अशोक नानचे यांच्या गवताच्या दोन गंजी व जनावरांचा गोठा असून जर गाडी ने आणखी पेट घेतला असता किंवा गाडीचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता व मोठे नुकसान ही झाले असते.मात्र केवळ खाकी वर्दी ने दाखवलेल्या धाडसामुळे पुढील अनर्थ टळला असल्याने फोंडाघाट ग्रामस्थांकडून कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांचे ग्रामस्थान कडून कौतुक करण्यात आले.



