देवगड,दि.१२ फेब्रुवारी
कुणकेश्वर गावातील मंडलीक मंदीराचा चौथरा हा अकराव्या शतकातील प्राचीन कुणकेश्वर मंदिराच्या नंदी मंडपाचा चौथरा असल्याचे प्राच्यविद्या अभ्यासक श्री. रणजित हिर्लेकर यांनी कोकण इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात संदर्भासह स्पष्टपणे दाखवुन दिले आहे. कणकवली काँलेजच्या एचपीसीएल सभागृहात कोकण इतिहास परिषदेचे १३वे राष्ट्रीय अधिवेशन दि. १० फेब्रुवारी रोजी भरले होते. याचे उद्घाटन उच्च शिक्षण खात्याच्या कोकण विभागाचे संचालक डाँ संजय जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी त्रिपुरा केंद्रीय विद्यापिठाचे माजी कुलगुरु डाँ. वि. वा. धारुरकर, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष श्री. सदाशिव टेटविलकर, डाँ. राजश्री साळुंखे, प्राचार्य युवराज महालिंगे, डाँ. विद्या प्रभु , श्री. प्रकाश देशपांडे, प्रा. सोमनाथ कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कणकवली येथे भरलेल्या या इतिहास परिषदेच्या अधिवेशनात कुणकेश्वर मंदिरा संदर्भातील आपला संशोधन लेख सादर करताना कुणकेश्वर परिसरातील सर्वच मुख्य मंदिरे हि जांभ्या दगडात बांधलेली असताना मंडलीक मंदिराचा चौथरा हा बेसाल्ट या कठीण काळ्या पाषाणात इतका खर्च करुन का बांधला ? असा प्रश्न श्री. रणजित हिर्लेकर यांनी उपस्थित केला. या मंडलिक मंदिराच्या चौथऱ्याचे ड्राँईग तयार करुन त्यावरुन या चौथऱ्यास खूर, कुंभ, कर्णी, पद्म आदी विविध थर कसे बारकाईने कोरलेले आहेत हे त्यांनी यावेळी दाखवुन दिले. तसेच कुणकेश्वर मंदिराच्या संपुर्ण ग्राउंड प्लँनचे डाँईग उपस्थितां पुढे ठेवुन मंडलिक मंदिर हाच कसा नंदीमंडप आहे व पुढे मध्ययुगीन काळात त्यात कसे बदल झाले आहेत हे त्यांनी दाखवुन दिले.
या विषया अधिक स्पष्टीकरण देताना हिर्लेकर म्हणाले की कुणकेश्वर मंदिराचे हे उंच बांधकाम शिलाहार व चालुक्य काळातील मंदिर स्थापत्यशैली नुसार केलेले आहे. गर्भगृह, अंतराळ, मंडप, मुखमंडप आदी सारी रचना ही नागरशैली प्रमाणे असुन मुळात या मंदिराचे आज दिसणारे बांधकाम हे मुळच्या अकराव्या शतकातील कुणकेश्वर मंदिराच्या जागेवरच जांभ्या खडकात करण्यात आले आहे. या प्राचीन तिर्थाचे ऐतिहासिक व धार्मिक महत्व लक्षात घेता मराठा काळात पुर्नबांधणी करताना मुळ मंदिर जसे होते तसेच ते बांधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मुळ कुणकेश्वर मंदिर हे पाया पासून शिखरा पर्यंत काळ्या पाषाणात घडविलेले होते. हे सिद्ध करता येईल इतके या मंदिराचे शिखरा पर्यंतचे पुरेसे वास्तु घटक कुणकेश्वर येथील समुद्र किनारी सापडले आहेत. तसा रिपोर्ट पुरातत्व खात्या मार्फत शासन दरबारी यापुर्वीच दाखलही झालेला आहे.
मंडलीक मंदिराचा सुरक्षित राहीलेला हा चौथरा काळ्या पाषाणातील असुन मंदिर स्थापत्य रचने नुसार या मंदिराचा संपुर्ण आराखडा लक्षात घेता हा नंदी मंडपाचा सुरक्षित राहिलेला भाग अकराव्या शतकातील मूळ मंदिराचा असल्याचे स्वच्छ दिसुन येते. आजही या मंडलिक मंदिराच्या चौथऱ्यावर उभे राहीले असता येथुन थेट कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याचे दर्शन घडते. कुणकेश्वर मंदिर इतके उंच असताना व मुख्य गाभाऱ्या पासुन बऱ्यापैकी लांब असणाऱ्या या चौथऱ्यावरुन नंदीला थेट महादेवाचे दर्शन होईल इतकी अचुक वास्तु रचना अत्यंत कौशल्याने या ठिकाणी केलेली दिसते. यावरुनही हा नंदिमंडप असल्याचे स्पष्ट होते. आज जेव्हा आपण कुणकेश्वर मंदीर हे अकराव्या शतकातील मंदीर आहे असे म्हणतो तेव्हा मंदिर परिसरात अकराव्या शतकातील दाखवता येण्या जोगा हा मंडलिकाचा म्हणजेच नंदीमंडपाचा चौथरा हा अवशेष वगळता कोणताही महत्वाचा पुरावा या परिसरात उरलेला नाही. हा पुरातन चौथरा संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ऐतिहासिक महत्वाचा वारसा आहे. यास धक्का न लावता पुरातत्व खात्याने कुणकेश्वर ग्रामस्थ व कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टींचे सहकार्य मिळवुन याचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. असे मत यावेळी उपस्थित असलेल्या अनेक इतिहास विषयाच्या प्राध्यापक व इतिहास संशोधकांनी व्यक्त केले.