युवा केंद्र सिंधुदुर्ग व शिवमुद्रा स्पोर्ट्स क्रिकेट स्पर्धेत शिवकन्या देवगड विजेता तर एस. एस. पी. एम. इंजिनियरिंग कॉलेज कणकवली संघाने उपविजेतेपद पटकावले

तळेरे,दि.१२ फेब्रुवारी

युवा सप्ताह निमित्त शारीरिक तंदुरुस्त दिवसाचे औचित्य साधून प्रज्ञांगण-तळेरे, नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व शिवमुद्रा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने मुली व महिलांसाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत शिवकन्या देवगड विजेता तर एस. एस. पी. एम. इंजिनियरिंग कॉलेज कणकवली संघाने उपविजेतेपद पटकावले. कणकवली, वैभववाडी व देवगड अशा तीन तालुक्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ओव्हर आर्म सॉफ्ट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा वय वर्ष १५ ते २९ या वयोगटातील मुली व महिलांसाठी मर्यादित होती. या स्पर्धेचे उद्घाटन महिला क्रिकेटपटू, क्रिकेट प्रशिक्षक वैशाली शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, माजी सभापती तसेच गांगेश्वर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिलीप तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे, निवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, नियोजन समिती सदस्य सुधीर नकाशे, राजापूर अर्बन बँक शाखा, तळेरे शाखा व्यवस्थापक दुर्गेश बिर्जे, तळेरे विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, प्रा. हेमंत महाडिक, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुदवडकर, आरोग्य परिचारिका सुचिता तळेकर, देवगड माजी सभापती जयश्री आडिवरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये तब्बल ९ संघांनी सहभाग घेतला होता. यात कणकवली संघ आणि देवगड संघ अंतिम फेरीत पोहोचले. अंतिम सामन्यात विजय मिळवत शिवकन्या देवगड संघ विजेता ठरला. यावेळी उत्कृष्ट गोलंदाज भक्ती प्रताप कनेरकर (देवगड), उत्कृष्ट फलंदाज कृपा नरसिह पटेल (कणकवली), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मधुरा मिलिंद सावंत (देवगड), मालिकावीर तन्वी लिलेश बिरजे (देवगड), शिस्तबद्ध संघ माधवराव पवार कोकिसरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला आकर्षक चषक, सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला सरपंच हनुमंत तळेकर, माजी सरपंच शशांक तळेकर, दुर्गेश बिर्जे, उदय दुदवडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेला पंच अक्षय मेस्त्री, संदेश सुतार, चंद्रकांत जाधव यांनी तर गणेश पवार व मयूर गोरुले यांनी स्पर्धेचे धावते वर्णन करून रंगत आणली. श्रावणी कंप्यूटर चे संचालक सतीश मदभावे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना, प्रणाली मांजरेकर यांनी सूत्रसंचालन तर प्रज्ञांगण च्या संचालिका सौ. श्रावणी मदभावे यांनी आभार व्यक्त केले.

नेहरू युवा केंद्राच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेला गणेश साटम, हनुमंत तळेकर, सुधीर नकाशे, नरपत शेठ, नितीन शेठ, विनायक केसरकर, सौ नंदा राणे, शुभम देसाई, प्रणय बांदिवडेकर, सौ. सुचिता परब, शिवमुद्रा स्पोर्टस् यांचे विशेष सहकार्य मिळाल्याने स्पर्धा यशस्वी झाली.