देवगड,दि.२२ फेब्रुवारी
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा – २ अंतर्गत सन २०२४-२५ मधील घरकुल मंजूर लाभार्थ्यांना मंजूरी आदेश वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम ना. अमित शहा, गृहमंत्री भारत सरकार, ना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ना जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास व पंचायतराज यांचे उपस्थितीमध्ये पुणे येथे सदरचा कार्यक्रम संपन्न् झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती देवगड मार्फत “छत्रपती संभाजी महाराज सभागृह” पंचायत समिती देवगड येथे दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करणेत आले होते. याच धरतीवरती प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत् तालुक्यातील ११९० लाभार्थ्यांना तालुकास्तरावरती व ग्रामपंचायत स्तरावरती मंजुरी आदेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती माजी सभापती लक्ष्मण ऊर्फ रवि पाळेकर,माजी सभापती भाई पारकर,माजी सभापती सदाशिव ओगले, माजी उपसभापती रविंद्र तिर्लोटकर,माजी पंचायत समिती सदस्या शुभा कदम,देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी कुणाल मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वतचे पक्के घर असावे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न् आहे हे लक्षात घेवून प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व शहरी सुरु करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये ३०२४-२५ या वर्षामध्ये २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व १० लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी प्रथम हप्ता वितरीत करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून तालुक्यामध्ये पंचायत समिती स्तरावरती व ग्रामपंचायत स्त्रावरती ११९० लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व लाभार्थ्यांना शासनाकडून मंजुर करण्यात आलेल्या घरकुलांचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करुन घरकुल पुर्ण करण्यासाठी आवाहन करण्यात आले. तसेच घरकुल बांधकामासाठी लागणारे सहकार्य पंचायत समिती देवगडच्यावतीने करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांकडून शासनाचे अभिनंदन करण्यात आले.
फोटो- प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण मधील मंजुर लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण करताना पदाधिकारी व अधिकारी वर्ग लाभार्थ्यांसमवेत