उच्चांकी गर्दीने यात्रोत्सवाच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढतानाच आंगणेवाडीकडे जाणारे सर्व रस्ते हे वाहनांनी भरून गेले
मालवण,दि.२२ फेब्रुवारी
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. शनिवारी भल्या पहाटे ३ वाजल्यापासून भराडी देवीच्या प्रांगणात जणू भक्तांचा महामेळा भरला. श्री देवी भराडीच्या या महामेळ्यास शनिवारी रात्री भाविकांच्या अलोट अशा उच्चांकी गर्दीने यात्रोत्सवाच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढतानाच आंगणेवाडीकडे जाणारे सर्व रस्ते हे वाहनांनी भरून गेले होते.
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेस आज पहाटे तीन वाजल्या पासून सुरुवात झाली. धार्मिक विधी संपन्न झाल्यावर पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांसाठी भराडी मातेचे दर्शन खुले करण्यात आले. दहा वेगवेगळ्या रांगांमधून दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. तर दिव्यांग भाविकांसाठी आंगणे ग्रामस्थ मंडळाकडून रिक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.
या यात्रोत्सवात सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे, खासदार नारायण राणे, सौ. नीलम राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक, आम. निलेश राणे, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, आमदार निरंजन डावखरे, खासदार अरविंद सावंत यांच्यासहभाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतुल काळसेकर, दत्ता दळवी, इर्शाद शेख, अरविंद मोंडकर, रुची राऊत, संदेश पारकर, अरुण दूधवडकर, सुशांत नाईक, माजी मंत्री आमदार अनिल परब, राजा गावकर, महेश राणे, बबन शिंदे, नीलम शिंदे, हरी खोबरेकर, संमेश परब अशोक सावन्त, सुदेश आचरेकर, विजय केंनवडेकर, गणेश कुशे आपा लुडबे, साईनाथ चव्हाण, पल्लवी तारी, विश्वास गावकर, पंकज वर्दम, अनिल कांदळकर, उमेश मांजरेकर, बंडू चव्हाण, सुनील घाडीगांवकर, माजी नगरसेवक सदा परब, अमित इब्राह्मपुरकर, मेघनाद धुरी, विशाल ओटवणेकर, छोटू ठाकूर, मानसी पालव, तसेच अनेक राजकीय पुढारी, व इतर मान्यवर मंडळींनी तसेच प्रांतधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी यात्रेस उपस्थित राहून भराडी मातेचे दर्शन घेतले. देवीच्या दर्शनानंतर स्वागत कक्षात आंगणे कुटूंबियांच्या वतीने या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
आंगणेवाडी यात्रेनिमित्त यात्रा परिसरात विविध प्रकारची दुकाने स्टॉल, हॉटेल्स थाटण्यात आली होती. प्रसाद, खाद्य पदार्थ, कपडे, खेळणी, शोभेच्या वस्तू, लोखंडी भांडी, शेती हत्यारे, लाकडी व बांबू पासून बनविलेल्या वस्तू आदी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. तर विविध हॉटेल्स, चहाची स्टॉल मध्येही भाविकांनी गर्दी करत पेटपुजाही केली. यामुळे जत्रेत मोठी आर्थिक उलाढालही झाली. तसेच मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ प्रकार तसेच मौत का कुआ, आकाशपाळणा आदी साहसी प्रकारही दिमतीला होते.
या यात्रेत भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची कार्यालये उभारण्यात आली होती. या कार्यालयाना त्या त्या पक्षाच्या बड्या नेत्यांनी उपस्थिती भेट दिली. तर सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतर्फे आयोजित महिला बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात् आले होते. या भव्य प्रदर्शनात महिलांनी विविध स्टॉलद्वारे आपल्या मालाची विक्री केली. त्यास ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.रविवारी मोड यात्रेने सोहळ्याची सांगता होणार आहे. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आंगणे कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे एकूण दहा रांगा तसेच मुखदर्शन व्यवस्थेमुळे भाविकांना कमीत कमी वेळेत देवीचे दर्शन झाले.