राष्ट्रीय प्रवासी दिनानिमित्त कणकवली प्रवासी संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पुरस्कारांचेही होणार वितरण

कणकवली दि.१२ फेब्रुवारी(भगवान लोके)

तालुका प्रवासी संघ कणकवलीच्यावतीने राष्ट्रीय प्रवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, १६ फेब्रुवारीला सकाळी १० वा. येथील नगरवाचनालयाच्या कै. आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक, क्रीडा, साहित्यिक, पत्रकार, रिक्षा, बसचालक यांच्यातील अतुलनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. प्रवासी संघातर्फे गेली पाच वर्षे अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून प्रवाशांचे विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रवासी संघ नेहमीच कार्यरत राहीला आहे.

पुरस्कार देण्यात येणाऱ्यांमध्ये लोककलाकार पद्मश्री परशुराम गंगावणे, आनंदाश्रम वृद्धाश्रमाचे बबनकाका परब, प्रतिथयश साहित्यिका, शिक्षिका सरीता पवार, ज्येष्ठ पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते राजस रेगे, पोलीस कर्मचारी राजाराम पाटील, रिक्षाचालक महेंद्र उर्फ राजू चिंदरकर, कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणारे सावंतवाडी येथील डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, विनाअपघात २४ वर्षे सेवा देणारे एसटी बसचालक संदीप शिरोडकर, स्वच्छतेविषयक कामगिरी करणारे किशोर तांबे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनायक जोशी, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पोलीस निरीक्षक मारूती जगताप, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रवासी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, सचिव विलास चव्हाण, सुभाष राणे यांनी केले आहे.