सावंतवाडी,दि.२३ फेब्रुवारी
सिंधुदुर्ग सह कोल्हापूर रत्नागिरीतील काजू उत्पादक शेतकरी संघटना २०२४ च्या काजू हंगामापूर्वी आक्रमक झाल्याने उत्पादन खर्चापेक्षा ही कमी असलेल्या किंमतीला सपोर्ट प्राईस म्हणून दहा रुपये अनुदान प्रति किलो देण्याचे शासनाने जाहीर केले. ते लवकरच मिळेल असा विश्वास बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी व्यक्त केला.
२०२४ च्या काजू हंगामासाठी राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान योजनेस ९ जुलै २०२४ रोजी शासनाने निर्णय मान्यता दिली आणि या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची नियुक्ती करण्यात आली .कमीत कमी ५० किलो ते जास्तीत जास्त दोन हजार किलो पर्यंत किलोमागे दहा रुपये अनुदान देण्याची शासनाने जाहीर केले .परंतु यामध्ये जीएसटी ची पावती;कमी कालावधी;व कोकणातील सामायिक क्षेत्रातील सातबारा वरील सर्व हिस्सेदाराची १०० रु .स्टॅम्प पेपर वर संमती .अशा जाचक अटी घातल्याने सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघटनेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संघटना आक्रमक झाल्या आणि जीएसटी च्या पावती ऐवजी गुमास्ता लायसन्स धारक काजू व्यापारी व सामायिक सातबारावर स्व हमीपत्र अशा अटी शिथिल करण्यात आल्या .मात्र त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रमाणे चार वेळा मुदतवाढ देण्यात आली . ३१ डिसेंबर या अंतिम तारखेपर्यंत एकूण ५१८५ अर्ज प्राप्त झाले .मात्र अनेक अर्जांमध्ये त्रुटी असल्याने २७४१ अर्ज हे अनुदानासाठी ग्राह्य मानले गेले .यामध्ये सिंधुदुर्ग ७४३ प्रस्ताव कोल्हापूर १५२५ व रत्नागिरी ४४३ अर्ज ग्राह्य मानून त्या अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव मांडला गेला .मात्र उर्वरित २४४४ अर्जातील त्रुटी काढून हे अर्ज पुन्हा शासनाकडे पाठविले जाणार आहेत . यासाठी सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाचे अध्यक्ष श्री विलास सावंत यांनी काजू मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय कदम व काजू बोर्डाचे डायरेक्टर डॉ. श्री परशुराम पाटील यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी विनंती केली .काजू बोर्डाचे डायरेक्टर श्री परशुराम पाटील यांनी सदर प्रस्ताव वित्त आयोगाकडे गेले असून एकूण २७४१ प्रस्तावित अर्जाना एकूण तीन कोटी ३६ लाख अनुदान लवकरच मिळणार असल्याचे सांगितले .त्याप्रमाणे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील त्रुटी असणाऱ्या काजू उत्पादक शेतकऱ्यांचे अर्ज वेंगुर्ला येथील काजू बोर्डाच्या कार्यालयात आणून त्यातील त्रुटी दूर करून ते प्रस्ताव पुन्हा शासनाकडे देण्याचे मान्य केले आहे .
यासाठी छाननीत त्रुटी असणारे अर्ज लवकरच बांदा व दोडामार्ग येथील कार्यालयात आणून एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांना बोलवून त्या त्रुटी दूर केल्या जातील असे श्री विलास सावंत यांनी सांगून संघटनेचे संपूर्ण सहकार्य असल्याचे सांगितले .त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराज न होता आपल्याला काजू बोर्डाकडून आलेल्या नोटीसी तील त्रुटी संदर्भातील कागदपत्रे घेऊन एकाच दिवशी संघटनेच्या ऑफिसमध्ये यावे .त्रुटी दूर करून पुन्हा प्रस्ताव सादर केले जातील अशी ग्वाही दिली .