राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ‘स्वराज्य सप्ताहा’चे आयोजन

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांची माहिती

कणकवली दि.१२ फेब्रुवारी(भगवान लोके)
सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने दि. १२ ते १८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ‘स्वराज्य सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. यात स्वराज्य पताका, सेल्फी विथ किल्ला, रयतेचा मेळावा, चित्र प्रदर्शन, मोटारसायकल रॅली, रांगोळीस्पर्धा, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिली.

कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे स्वराज्य सप्ताहाच्या आयोजनाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत श्री. नाईक बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अस्लम खतिब, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, सर्फराज नाईक, तालुकाध्यक्ष सर्वश्री संदीप पेडणेकर, राजेंद्र पावसकर, आर. के. सावंत, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, अल्पसंख्यांक प्रदेश महासचिव शफिक खान, महिला तालुकाध्यक्षा सर्वश्री पुजा पेडणेकर, ऐश्वर्या कदम, जिल्हा सचिव गुरूदत्त कामत, प्रसाद कुलकर्णी, प्रातिक सदस्य बाळा कोयंडे, प्रभाकर चव्हाण, गणेश चौगुले, सुशिल चमणकर, मनोहर साटम आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ता त्यांनी स्थापन केलेले ‘राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे’ व त्यातील संकल्पना सप्ताहाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवरायांच्या संकल्पनेतून शासन चालविण्याची प्रेरणा घेतो, हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा मुख्य उद्देश या सप्ताहाचा आहे. यानिमित्ताने आठवडाभार विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत चौकाचौकात स्वराज्य पताका लावण्यात येणार आहेत. तसेच शिवरायांच्या किल्ल्यांच्या अनुषंगाने तालुक्यांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी सेंल्फी विथ किल्ला पॉईंट उभारण्यात येणार आहेत. १८ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे रयतेचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्ताने मोटारसायकल रॅली, चित्रकला, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनही करण्यात आलेले आहे. तसेच चित्र प्रदर्शन व शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आलेले आहे. त्यात जास्तील जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. नाईक यांनी केले.

१८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयांच्या माहितीची पत्रकेही वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिली. तसेच राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या माध्यमातूनही यानिमित्ताने उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.