असंख्य समस्यांच्या गर्तेत सापडलेले तळेरे एसटी बस स्थानक…!!

सिंधुदूर्ग जिल्हा विभाग नियंत्रक यांनी वेळीच लक्ष घालण्याची गरज.

तळेरे,दि.१२ फेब्रुवारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळख असलेल्या तसेच मुंबई – गोवा व तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेले महत्वाचे तळेरे बसस्थानक सध्या समस्येच्या गर्तेत सापडले आहे. येथे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना साध्या पिण्याच्या पाण्याची सोय नसून त्याचबरोबर स्वच्छता व इतर सुविधांवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. या समस्यांबाबत वरीष्ठ कार्यालय कणकवली आगार प्रमुख यांना वाहतूक नियंत्रक, तळेरे यांच्या मार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. तरी येत्या पंधरा दिवसांत तळेरे बसस्थानकात सुविधा उपलब्ध करा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा स्थानिक नागरीकांसह प्रवाशांनी दिला आहे. याप्रश्नी सिंधुदूर्ग जिल्हा विभाग नियंत्रक यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज असून तळेरे बसस्थानकाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत.

तळेरे बसस्थानकाची दुरावस्था पाहता राज्यात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस.टी स्थानकांबाबतच्या मोहिमेची घोषणा केली होती.याअंतर्गत राज्यातील ५६० एसटी स्थानकांमध्ये बसस्थानक, स्थानक परिसर, स्वच्छतागृहे, बस यांची स्वच्छता, स्थानक सुशोभीकरण यावर गुण निश्चित केले आहेत. यात तळेरे बसस्थानकाचे सर्वेक्षण झाले होते मात्र या समस्या पाहता कीती गुण मिळाले असतील आणि किती गुण द्यायचे हा प्रश्न अधिका-यांनाच पडला असेल.

नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेल्या तळेरे बसस्थानकात आठ तालुक्यासह परजिल्हा व राज्यात शंभरहून अधिक बसफे-या दररोज येजा करत असतात. त्याचबरोबर गणेशोत्सव,मे महिन्यात प्रवाशांची तर रिघच असते त्यात कोल्हापूर, मुंबई वरून येणारे अनेक प्रवाशांना तळेरे हे मध्यवर्ती ठिकाण अनेकजण तळेरेलाच पसंती देतात. यामुळेच प्रवाशी संख्या असतांना तळेरे बसस्थानकाच्या दुराव्यस्थेला जबाबदार कोण? असा प्रश्न पडला आहे. दुरावस्थेबाबत वाहतूक नियंत्रक अविनाश दळवी यांनी आपल्या वरीष्ठ कार्यालयात, आगार व्यवस्थापक कणकवली यांच्याकडे पूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र अध्यापपर्यंत यावरती ठोस उपाययोजनांबाबत पाऊल उचलले जात नसून प्रवाशांना चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्यात एसटी महामंडळ कमी पडत आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते असा प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

असंख्य समस्यांकडे दुर्लक्ष:-
यामध्ये प्रमुख्याने येथील पाण्याची विहीर साफसफाई करण्याबरोबरच विहिरीला पुरेसे पाणी उपलब्ध नाही. त्याचबरोबर पाईपलाईनला गळती असल्याने पाण्याच्या टाकीत पाणी भरण्यासाठी पंप वारंवार चालू करावा लागत असल्याने वीज बील देखील जास्त येत आहे. तसेच स्वच्छतागृहांची पुरेशी स्वच्छता नसल्याने परिणामी दुर्गंधी येते तसेच वाॅश बेसिन, आरसा लावण्यात यावा, तसेच ग्रा.पं.कडून पाण्याचे कनेक्शन घेण्यात यावे जेणेकरून पाण्याची व्यवस्था करणे सुलभ होईल. तसेच स्थानकाच्या आवारात परीसरातीलच बिल्डिंग मधील रहिवाशी नागरीक कचरा टाकत असल्याने दिवसेंदिवस कचऱ्याचे साम्राज्य वाढत चालले आहे. त्यांच्यावरती योग्य ती कारवाई किंवा निर्बंध घातले जात नसल्याने याची जबाबदारी ग्रामपंचायतीने स्विकारुन कचरा टाकणाऱ्यां वरती किंवा बिल्डिंग मालकांवरती कठोर दंडात्मक कारवाई करावी. तसेच बस स्थानकाच्या खिडक्यांना दरवाजा बसविणे अशा अनेक समस्या असून याबाबत वरीष्ठ अधिकारी सौ.दळवी यांनी देखील तसे आदेश दिले आहेत. अशा अनेक समस्यांच्या गर्तेत तळेरे एसटी बस स्थानक सापडले आहे.

तळेरे बसस्थानकात सध्या पाण्याची टाकी पाहली असता आतमध्ये धुळीचे साम्राज्य असून एखादा व्यक्तीला पाणी पाण्यासाठी व्यवस्था नसल्याने गंभीर दखल घेण्याची गरज आहे. तसेच परीसरात स्वच्छता, इमारत व स्वच्छतागृहाची दुरूस्ती,चालक वाहक यांना सुसज्ज विश्रांती गृह,संपूर्ण परीसराचे डांबरीकरण,सुशोभीकरण,वृक्षारोपण अशी प्रकारे अनेक कामे करण्याची गरज आहे. अनेकवेळा सामाजिक बांधिलकीतून मदतकार्य करण्यात आले आहे.तसेच बस स्थानक परिसराचे ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानांतर्गत नेमण्यात आलेल्या पथकाने सर्वेक्षण व परीक्षण केले.त्यावेळीही या समस्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र आजही समस्या जैसे थै आहेत. तरी राज्य परिवहन महामंडळाचे तळेरे बसस्थानकाकडे अक्षरशः जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांसह प्रवाशी व ग्रामस्थ करीत आहेत.

तळेरे माॅडेल बसस्थानक कागदावरच :-

तळेरे एसटी महामंडळाचे बसस्थानक राज्यातील मॉडेल बसस्थानक होणार असल्याची घोषणा दहा वर्षांपूर्वी राज्य शासनाने केली होती. याबाबत तात्कालीन आमदार प्रमोद जठार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र आजही आजही तळेरे बसस्थानक कोणतेही मॉडेल बनू शकले नसून समस्येच्या गर्तेत अडकलेले दिसत आहे. राज्यातील बारा बसस्थानकांचे मॉडेल बसस्थानकात रुपांतर करण्याची घोषणा त्यावेळी झाली होती; मात्र जिल्ह्यातील तळेरे मॉडेल स्थानकांचे स्वप्न कागदावरच राहिले राहिले आहे. नवीन बसस्थानकाची सुसज्ज इमारत उभारणी करणे. खूप मोठा परिसर असून बसस्थानक परिसरात व्यापारी संकूल उभे राहू शकते त्यातून एस.टी.महामंडळाला आर्थिक लाभ होण्यास मदत होईल. याबाबत विद्यमान सरपंच हनुमंत तळेकर यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. तसेच त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करावेत.

एसटी कॅन्टीन बंदावस्थेत:-
तळेरे बसस्थानकात प्रवाशी व चालक वाचकांसाठी एसटी कॅन्टीन यापूर्वी सुरू होते. मात्र तेदेखील काही कारणाने सध्या बंदावस्थेत आहे. त्यामुळे प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे. तरी सदरचे एसटी कॅन्टीन पुन्हा पुर्ववत सुरू करण्यात यावे.

बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नाही:-
बसस्थानकात स्वच्छतागृह व स्वच्छता अशा अनेक समस्या आहेत मात्र मुख्य पाणीच्या टाकीत पाणीच नसल्याने पिण्याच्या पाण्याची मुख्य समस्या असून नागरीकांना पिण्यासाठीचे पाणी पैसे देऊन विकत घ्यावे लागते किंवा परीसरातील हाॅटेलचा आसरा घ्यावा लागत आहे.त्यात पिण्याच्या पाण्याची टाकी गेली कित्येक दिवस बंद असल्याने टाकीत धुळ साचली आहे.
या सर्व समस्यांवरती योग्य तो तोडगा काढून प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक व त्यांच्या संबधित टीमने प्रत्यक्षात बस स्थानकाला भेट देऊन समस्या जाणून घेऊन मार्गी लावाव्यात अशी आग्रहाची मागणी केली जात आहे. अन्यथा हा प्रश्न ऐरणीवरती येऊन तीव्र आंदोलनात्मक पाऊल उचलले जाणार एवढे मात्र निश्चित.