आचरा,दि. २६ फेब्रुवारी (अर्जुन बापर्डेकर)
इनामदार श्री देव रामेश्वर कुणकेश्वर महास्थळ भेटीसाठी देवस्वारीसोबत जाण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.महाशिवरात्रीला रात्रौ उशिरा श्री क्षेत्र कुणकेश्वरला इनामदार श्री देव रामेश्वराने भेट दिली
महाशिवरात्रीला सकाळी अकराच्या सुमारास आचरा रामेश्वर मंदिर येथून श्रींची स्वारी श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळ भेटीसाठी शाही लवाजम्यासह राजेशाही थाटात ढोलताशांच्या गजरात निघाले होते. हजारोंच्या संख्येने भाविक या स्वारीत सामिल झाल्याने लांबचलांब रांगा लागल्या होत्या.पारवाडी येथे होड्या तराफामधून पारंपारिक मार्गाने स्वारी मुणगे हद्दीत आल्यानंतर पारंपरिक वाटेने दगडधोंड्याची रणरणत्या उन्हाची पर्वा न करता लहानथोर वयोवृद्ध तसेच महिला भगिनी अनवाणी श्रींच्या स्वारी सोबत निघाले होते.या भाविकांसाठी ठिकठिकाणी अल्पोपहार,शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
मश्वीवाडी विकास मंडळ आणि मित्र परिवारातर्फे खिचडीचे वाटप करण्यात आले.हिंदळे येथील ग्रामस्थ देवेंद्र तेली,नरे, जामसंडेकर,साहिस परब, दर्शन परब, दर्शन तेली आदी भटवाडी ग्रामस्थांनी शितपेयाची,तसेच .हिंदळे राणेवाडी येथील ग्रामस्थांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.मिठबांव येथील ग्रामस्थांनीही महाप्रसादाची व्यवस्था केली होती. रणरणत्या उन्हातही हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाल्याने स्वारी सोबत लांबचलांब रांगा लागल्या होत्या.ठिकठिकाणी कचराकुंड्या उभारण्यात आल्यामुळे कचरा व्यवस्थापन केले जात होते..डॉ सिद्धेश सकपाळ आणि सहकारी सिताराम सकपाळ,रुपम टेमकर, अनिकेत पांगे ॅअम्बूलन्सह तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ कपिल मेस्त्री व त्यांचे वैद्यकीय पथक या स्वारी सोबत भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तत्परतेने सेवा देत होते.देवस्थान समिती अध्यक्ष प्रदीप प्रभू मिराशी आणि सहकारी सहभागी होत व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.
रात्री उशिरा फटाक्यांच्या आतषबाजीत कातवन सागरकिनारयावरुन श्रींची स्वारी कुणकेश्वर महास्थळास भेटीसाठी दाखल झाली होती.