शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षाना फार मोठे महत्व- मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत

मालवण,दि.१२ फेब्रूवारी

शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षाना फार मोठे महत्व आहे. शिष्यवृत्ती म्हणा अथवा तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या परीक्षामुळे मुलांमधील शैक्षणिक गुणवत्ता ही वाढीस लागते. आज भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईने भंडारी हायस्कुल एस. एस. सी. बॅच १९८५ – ८६ च्या सहकार्याने शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे जे आयोजन केले आहे त्याचा लाभ विध्यार्थ्यांनी घेऊन स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश संपादन करावे आणि आपल्या बरोबच आपल्या शाळेचे नाव उंचवावे असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वामन खोत यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी हायस्कुल येथे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले असून या वर्गाचा शुभारंभ आजपासून झाला. यावेळी भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. एच. बी. तिवले सर, मार्गदर्शन वर्गाचे तज्ञ शिक्षक श्री. सागर मिसाळ, कु. मनाली वेंगुर्लेकर, प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी श्री. देसाई यांनी एस. एस. सी. बॅच १९८५ – ८६ च्यावतीने घेत असलेल्या या मार्गदर्शन वर्गाची माहिती दिली. तर मुख्याध्यापक श्री. तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सागर मिसाळ, मनाली वेंगुर्लेकर यांनीही मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन वर्गासाठी मालवण शहर आणि परिसरातील शाळांमधील इयत्ता पाचवी मधून ५१ विध्यार्थी तर इयत्ता आठवी मधून ४६ विध्यार्थी सहभागी झाले आहेत. हा वर्ग चार दिवस चालणार आहे. या मार्गदर्शन वर्गाला विध्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मुख्याध्यापक श्री. तिवले यांनी समाधान व्यक्त केले.