कणकवली दि १२ फेब्रुवारी(भगवान लोके)
वारगांव येथील एसटी बस स्टॉपवर प्रवाशांनी हात दाखवूनही बस अर्धा कि.मी. पुढे नेऊन थांबविल्याबाबत बस चालकाला शिवीगाळ करून फोनद्वारे तळेरे स्थानकावर कार्यकर्त्यांना जमण्यास सांगितले. तसेच तळेरे येथे कार्यकर्त्याद्वारे चालकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून तत्कालीन जि.प. सदस्या रत्नाप्रभा वळंजू व तळेरे येथील किशोर भांबुरे यांची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
दि. १४ ऑगस्ट २०१४ रोजी रत्नागिरी तळेरे मार्गे मालवण जाणारी बस वारगांव येथील बसस्टॉपवर सकाळी ११.३० वा. आली. तेथील प्रवाशांनी बसला थांबण्यासाठी हात दाखविला. परंतु, बस चालकाने सुमारे अर्धा कि.मी. अंतरावर उभी केली. त्यानंतर बसमध्ये चढलेल्या तत्कालीन जि.प. सदस्या रत्नप्रभा वळंजू यांनी बसचालक सुर्यकांत मधुसूदन काणेकर रा. माणगांव ता. कुडाळ याला शिवीगाळ करून जाब विचारला. त्यानंतर चालकाला धडा शिकविण्यासाठी फोनद्वारे कार्यकर्त्याना तळेरे बसस्थानकावर जमा होण्यास सांगितले. त्यानुसार बस तळेरे येथे आली असता वाहतूक निरीक्षक यांच्या केबीनमध्ये चालक एन्ट्री करण्यासाठी गेले असता तेथे जमलेल्या २० ते २५ लोकांच्या जमावाने चालकाला शिवीगाळ व झडापटी करून जबर मारहाण केली. वाहतूक नियंत्रक दत्तू कोरडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी चालकाला आरोपींच्या नावाची माहिती झाली. तोपर्यंत जमावातील काहींनी त्याचा मोबाईल काढून घेत पोलिसांकडे फिर्याद दिली तर बसस्थानकाबाहेर जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तरीदेखील शिताफीने चालकाने बस मार्गस्थ केली. त्याचबसमधून रत्नप्रभा वळंजू यांनी कणकववलीपर्यंत प्रवास केला. त्यामुळे त्याने पोलिसांत फिर्याद दिली नाही. त्यानंतर दुसऱ्यादिवशी १५ ऑगस्ट रोजी संध्या. मालवण पोलिस स्थानकात तक्रार दिल्यावरून आरोपींच्याविरूद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनावणीदरम्यान पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, पुराव्यातील विसंगती यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.