मालवण,दि.१२ फेब्रूवारी
मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आढळून येत असतानाच मालवण येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य वाणी समाज वधू वर सूचक मेळावा व स्नेहसंमेलनात मराठा आरक्षणातील सगेसोयरे आणि गणगोत या दोन्ही शब्दांना विरोध दर्शविताना मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता नये याची दक्षता शासनाने घेतली पाहिजे असे प्रतिपादन ओबीसी व आरक्षित समाज महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी व्यक्त केल्यानंतर तशा आशयाचा ठराव या मेळाव्यात मांडण्यात आला
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य वाणी समाज आणि मालवण तालुका वैश्य वाणी समाज आयोजित ३६ वा वधुवर मेळावा व स्नेहसंमेलन मामा वरेरकर नाट्यगृहात पार पडले यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, प्रमुख अतिथी म्हणून गोवा येथील डॉ. मनिष कुशे, माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, तसेच जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, तालुकाध्यक्ष महेश अंधारी, सचिव शैलेश पावसकर, सुनील डुबळे, उमेश वाळके, समीर अंधारी, गणेश कुशे, श्रीकृष्ण पोफळे, प्रसाद पारकर, अस्मिता बांदेकर, रमेश बोंद्रे, सागर शिरसाट, सदानंद माईणकर, बिपीन कोरगावकर, महेंद्र मुरकर, साक्षी वंजारी, नाना पारकर, राजाराम केणी, दत्ताराम आळवे, प्रकाश कुशे, सौ. पावसकर, राजेश रेडीज, मसदेकर, आरेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यानी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य वाणी समाज जिल्हा स्नेहसंमेलनातून पिढी घडविण्याचे काम होत आहे. आपली सनातन धर्मसंस्कृती जपण्याचे काम आपल्या हातून होत आहे. आपली संस्कृती पाश्चात्य देशांमध्ये मान्य करण्यात आली आहे. अनेक देश आज आपल्या कौटुंबिय व्यवस्थेवर पीएच. डी. करताना दिसत आहेत. त्यामुळे आपली समाजव्यवस्था आजही अन्य देशांसाठी आदर्शवत अशीच आहे. आपल्या मुलांना आपल्या गावातच रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी वैश्य वाणी समाजातील प्रत्येक घरामध्ये उद्योजक आणि व्यापारी निर्माण झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
माजी आमदार राजन तेली यांनी प्रमोद जठार यांना भावी खासदार म्हणून शुभेच्छा देताच सभागृहातूनही टाळ्याचा कडकडाट झाला. तर संदेश पारकर यांनी वैश्य वाणी समाजात एकसंघपणा असला पाहिजे. कोणतीही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. आपल्या समाज बांधवाला मोठे करण्याची संधी मिळाल्यास प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन केले.
वैश्य समाज जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे यांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही राज्यांचे मिळून राज्यस्तरीय त्रिवेणी संगम अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी कला क्षेत्रातील योगदानाबद्दल . साई पारकर, सुशांत तायशेटे यांचा तसेच युवा उद्योजक म्हणून समीक्षा म्हाडगूत, अमित कोरगावकर, पुष्कर तायशेटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ समाजबांधव म्हणून नाना पारकर, राजाराम केणी, दत्ताराम आळवे, लक्ष्मण आळवे, अशोक गाड, संगीता वंजारी, रमेश म्हाडगूत, मोहन शिरसाट, सीताराम करमळकर यांचा सत्कार करण्यात आला. वैश्य समाज पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गणेश कुशे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संचालकपदी विजयी झालेले उमेश वाळके, सुनील डुबळे, समीर वंजारी यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मयुरा माणगावकर-भिसे व नितीन वाळके यांनी केले.