न.पं.प्रभाग १४ मधील स्टेज बांधकाम कामासाठी ठराव देण्यास नगराध्यक्षांचा स्पष्ट नकार

जामसंडे पीकअपशेडजवळील वॉटर एटीएम् चुकीच्या पध्दतीने नियमात नसताना बांधण्यात आले

देवगड,दि.१२ फेब्रूवारी

देवगड जामसंडे न.पं.चा प्रभाग क्रमांक १४ मध्ये खासदार न{धीतून मंजुर झालेल्या स्टेज बांधण्याचा कामासासाठी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीसाठी आवश्यक असणारा ठराव द्यावा अशी मागणी या प्रभागाच्या नगरसेविका यांनी केला मात्र हा ठराव देण्यास नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी स्पष्ट नकार दिला.विरोधी भाजपा नगरसेवकांबरोबरच सहकारी असलेल्या सत्ताधारी नगरसेवकांनीही विकासकामाचा ठराव द्यावा या मागणीस पाठींबा देवून नगराध्यक्षांना विनवणी केली मात्र नगराध्यक्षा नकाराच्या भुमिकेवर ठाम राहील्या यामुळे विकासकामांच्या ठरावावरून सभा गाजली.
देवगड जामसंडे न.पं.ची सर्वसाधारण सभा न.पं.सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेला उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, मुख्याधीकारी सुरज कांबळे, पाणीपुरवठा सभापती संतोष तारी, बांधकाम सभापती तेजस मामघाडी उपस्थित होते.
भाजपा नगरसेविका सौ.अरूणा पाटकर यांनी आपल्या प्रभाग १४ मधील न.पं.च्या खुल्या क्षेत्रात खासदार निधीतून मंजुर झालेल्या विकासकामांसाठी ठराव द्या अशी मागणी केली.यामध्ये लघुनळयोजना व स्टेज बांधकाम या कामांचा समावेश होता.मात्र नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी न.पं.च्या खुल्या क्षेत्रात यापुर्वीच अनधीकृतपणे स्टेजचे बांधकाम करण्यात आले आहे याबाबत काम सुरू झाल्यानंतर नोटीसा देवूनही काम पुर्ण केले असे सांगीतले.आपल्या प्रभागात अशाप्रकारे अनधीकृत बांधकाम करण्यात आले.न.पं.ने बांधकाम करू नये अशा नोटीसा देवूनही काम करण्यात आले यावेळी नगरसेविका म्हणून ते काम का थांबविले नाहीत असा प्रश्न नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी  केला.चुकीच्या कामांना मी कधीच ठराव देणार नाही असे स्पष्ट शब्दात नगराध्यक्षांनी सांगीतले. यावर भाजपा गटनेते शरद ठुकरूल व इतर सहकारी नगरसेवकांनी जर अनधीकृत बांधकाम असेल तर कायदेशीर कारवाई करून ते काढून टाकावे मात्र प्रभाग क्रमांक १४ नगरसेविका यांनी खासदार निधीतुन जी कामे मंजुर करून आणली आहेत अशा विकासकामांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसाठी ठराव द्यावा अशी मागणी केली यावेळी सत्ताधारी नगरसेवक संतोष तारी व तेजस मामघाडी यांनीही त्याला दुजोरा देत विकासकामांसाठी ठराव द्यावा अशी मागणी केली मात्र नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी केवळ लघुनळयोजनेसाठी ठराव देवू परंतू स्टेज बांधकामासाठी ठराव देणार नाही असे स्पष्ट सांगीतले.या विषयावरच सभेचे कामकाज जास्त वेळ चालले मात्र नगराध्यक्ष आपल्या भुमिकेवर ठाम राहील्या.शेवटी चार दिवसांनी योग्य ते मार्गदर्शन घेवून नंतरच त्याबाबत निर्णय घेवू असे साक्षी प्रभू यांनी सांगीतले.
जामसंडे एस्टी पीकअपशेडजवळील वॉटर एटीएम च्या विषयावरून नगरसेवक नितीन बांदेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले.जामसंडे पीकअपशेडजवळील वॉटर एटीएम् चुकीच्या पध्दतीने नियमात नसताना बांधण्यात आले असल्यामुळे त्याबाबत तक्रार करण्यात आली असून एस्टी प्रशासनानेही पत्र दिले आहे.याबाबतची माहीती द्या अशी मागणी करून नियमात नसताना चुकीच्या पध्दतीने वॉटर एटीएम् जामसंडे पीकअपशेड येथे बांधून शासनाच्या पैसा वाया घालविणा-या संबंधीत अधीका-यांची चौकशी करावी व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी बांदेकर यांनी केली.