देवगड,दि.१३ फेब्रुवारी(दयानंद मांगले)
तळवडे जिल्हा परिषद शाळा तळवडे नं.२ आंबेवाडी ता. राजापूर या शाळेला ७५ वर्षे झाली. या निमित्ताने शाळेचा अमृतमहोत्सव शुभारंभ नुकताच शाळेत अनेक उपक्रमानी मोठया उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी या शाळेचे माजी मुख्याध्यापक सखाराम साळवी तळवडे उपस्थित होते. या शाळेत उत्तम सेवा बजावून निवृत्त झालेले साळवी गुरुजी सध्या ९४ वर्षांचे असून त्यांनी या शाळेत १५ वर्षे सेवा दिली आहे..या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती सर्व माजी विद्यार्थ्यांना विशेषत्वाने भावली …. तर कित्येकजण त्यांच्यापुढे नतमस्तकही झाले. जीवनात गुरुच महात्म्य दाखविणारा हा क्षण प्रत्यक्ष अनुभवताना उपस्थित सर्व भारावून गेले.
याप्रसंगी साळवी गुरुजींचा शाळेच्यावतीने सन्मानपूर्वक त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते . आपल्या या वयातही स्पष्ट व खडया आवाजात त्यांनी आपल्या शाळेविषयीच्या आठवणी सांगताना उत्तम असे सर्वाना मार्गदर्शन केले. आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. मानवी जीवन समृद्ध करण्याचे सामर्थ्य शिक्षणात आहे असे विचार याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले. आपल्या शाळेचा अमृतमहोत्सव साजरा होत याचा निश्चित मला आनंद आहे. यासाठी सर्वांचे त्यांनी कौतुक केले आणि शाळेच्या या कार्यासाठी भरीव अशी आर्थिक मदत शाळेकडे सुपूर्त केली.
या कार्यक्रमाला गावाच्या सरपंच सौ. गायत्री साळवी,उपसरपंच . यशवंत साळवी,केंद्रप्रमुख श्री. खानविलकर,जेष्ठपत्रकार सुरेश गुडेकर,सेवानिवृत्त शिक्षक वसंत प्रभुदेसाई आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.