कुडाळ,दि. ७ मार्च
तालुक्यातील बाव -ब्राम्हणवाडी येथील आपल्या घरानजीकच्या बागेत वाळलेले गवत व झुडपाला आग लावून नंतर भडकलेली आग विझविताना त्या आगीचा भडका उडून बाळकृष्ण यशवंत नेवाळकर (८७, रा. बाव ब्राह्मणवाडी येथील यांचा जळून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर तेथीलच रामचंद्र मदन नेवाळकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.
बाळकृष्ण नेवाळकर हे सध्या आपल्या घरी एकटेच राहायचे. त्यांची मुले व अन्य कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्य असतात. त्याच्या घरानजीकच्या बागेतील गवत वाळले होते. तसेच काही झुडपेही वाढली होती. सदर बाग साफसफाई करण्यासाठी त्यांनी आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आग लावली. त्यावेळी त्यांच्यासोबत अन्य कुणीही नव्हते. दुपारची वेळ आणि सध्या अतिशय वाढलेला उष्मा त्यामुळे आग अल्प वेळेतच भडकली आणि वेगाने पसरू लागली. आपली बाग सोडून आजूबाजूला अन्य ग्रामस्थांच्या जमिनीत आग वेगाने पसरत असल्याचे पाहून त्यांची तारांबळ उडाली. दुसऱ्याच्या जमिनीत पसरलेली आग विझविण्यासाठी ते प्रयत्न करीत असताना आगीचा भडका उडून ते त्यात जळाले. सदरची आग स्थानिकांच्या कुंपणात आली आणि कुंपण जळाल्याचे समजताच सदर कुंपण मालकांनी तेथे धाव घेतली असता, बाळकृष्ण नेवाळकर त्याठिकाणी जळालेल्या आणि मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच नागेश परब व ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. कुडाळ पोलीसानाही घटनेची माहिती देताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, हवालदार कृष्णा परूळेकर व स्वप्नील चव्हाण तेथे दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी येथील शवागृहात आणला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वस्त यांनी विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.