आडारी गणेश मंदिर व रेवंडी येथील श्री भद्रकाली मंदिर येथे अथर्वशीर्ष पठण

मालवण,दि.१३ फेब्रूवारी
माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मालवण मधील श्री माघी गणेश मंदिर, जय गणेश मंदिर, आडारी गणेश मंदिर व रेवंडी येथील श्री भद्रकाली मंदिर येथे अथर्वशीर्ष पठण केले. मंत्रमुग्ध करणाऱ्या सुस्वरात विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठण करत श्री गणरायाची भक्तिमय सेवा करतानाच उपस्थित भाविकांची मनेही जिंकली. भंडारी हायस्कुल व प्राथमिक शाळेच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

मालवण येथील भंडारी हायस्कूल ही शैक्षणिक संस्था नेहमीच शिक्षणाबरोबरच सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यास अग्रेसर असते. या प्रशालेचे विद्यार्थी दरवर्षी गणेश चतुर्थी सणात मालवणातील घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पासमोर अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम राबवितात. याच पार्श्वभूमीवर आज प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी माघी गणेश जयंती निमित्त मालवण मधील विविध ठिकाणच्या माघी गणेश उत्सवाच्या ठिकाणी अथर्वशीर्ष पठण केले. मालवण येथील माघी गणेश मंदिरात विराजमान झालेला महागणपती येथे भंडारी हायस्कुल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात अथर्वशीर्ष पठण केले तर भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मेढा येथील जय गणेश मंदिर, आडारी येथील गणेश मंदिर व रेवंडी येत भद्रकाली मंदिरात विराजमान झालेल्या गणपती समोर अथर्वशीर्ष पठण केले. सुस्वरात आणि स्पष्ट उच्चारात विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या या अथर्वशीर्ष पठणाने वातावरण आणखीन भक्तिमय बनले. यामध्ये भंडारी ए सो हायस्कुलचे ४६ विद्यार्थी शिक्षिका पूजा कुडाळकर,ए एस चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्राथमिक शाळेचे २५ विद्यार्थी शिक्षिका सौ. राधा दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते.

अथर्वशीर्ष पठण केलेल्या गणेश देवस्थानासह उपस्थित भाविकांनी भंडारी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तारकर्ली, देवबाग व कुंभारमाठ याठिकाणच्या माघी गणेश जयंती उत्सवांमध्येही हे विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत.