आठ दिवसांत कार्यवाही करण्याची मागणी
बांदा,दि.१३ फेब्रुवारी
न्हावेलीतील बीएसएनएल टॉवरपासून अवघ्या 200 मिटर अंतरापर्यंत सुद्धा नेटवर्क मिळत नाही. परिणामी याचा फटका शालेय विद्यार्थ्यांसह शासकीय कार्यालयांना तसेच ग्राहकांना बसत आहे. भरलेले पैसे नेटवर्क अभावी वाया जात आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसांत सेवा सुरळीत न केल्यास सावंतवाडी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा न्हावेली ग्रामस्थांनी बीएसएनएल जिल्हा प्रबंधक यांना लेखी दिला आहे.
बीएसएनएल टॉवरची सेवा वारंवार खंडित होते. वेळोवेळी पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आज संतप्त बीएसएनएल ग्राहकांनी सावंतवाडी कार्यालयात धडक देत पुन्हा एकदा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, माजी उपसरपंच विशाल गावडे, अजित न्हावेलकर, सचिन पार्सेकर, गणेश नाईक, कमळाजी नाईक, रोशन आरोसकर, राजेश धाऊसकर, रामचंद्र धाऊसकर, विजय मेस्त्री, एकनाथ जाधव, मधुकर पार्सेकर, गंगाराम नेमण, आनंद आरोंदेकर, अंकुश मुळीक, कपील धाऊसकर, प्रथमेश धाऊसकर, प्रदीप गावडे, सुरेश बोंद्रे, शरदचंद्र मोहिते, आनंद नाईक, गंगेश्वर कोचरेकर, रामचंद्र परब, रोहिदास सावळ, भरत धाऊसकर, दिलीप गावकर, निलेश परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गावात अनेक दिवस बीएसएनएल सेवा नॉट रीचेबल झाली आहे. याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. ऑनलाईन काम करणे कठीण बनत आहे. ग्राहकांचे सेवेसाठी भरलेले सर्व पैसे वाया जात आहेत. याबाबत वारंवार लक्ष वेधूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही अद्यापही झालेली नाही. त्यामुळे येथील ग्राहकांना फटका बसून नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. येत्या आठ दिवसात सदर टॉवरची सेवा सुरळीत न केल्यास ग्रामस्थांच्यावतीने कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थ वजा ग्राहकांनी दिला आहे.