मालवण,दि.१३ फेब्रुवारी
मालवण शहरासह तालुक्यात माघी गणेश जयंती उत्सवाला भक्तीपूर्ण व उत्साहात सुरुवात झाली असून विविध ठिकाणी गणेश मूर्ती स्थानापन्न होऊन विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. माघी गणेश जयंतीनिमित्त मालवण मधील श्री माघी गणेश मंदिर, जय गणेश मंदिर, आडारी गणेश मंदिर, कुंभारमाठ येथे वायरीचा राजा, रेवंडी येथील श्री भद्रकाली मंदिर यासह इतर ठिकाणी गणेश दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री गणेशाची आरती, अथर्वशीर्ष पठण, भजन, लाऊड स्पीकरवर वाजणारी भक्तीगीते यामुळे वातावरण चैतन्यमय बनले असून सर्वजण श्री माघी गणेशाच्या भक्तीत रममाण झाले आहेत.
माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त काल सायंकाळी मालवणात विविध मंडळाच्या उत्सवात तसेच मंदिरांमध्ये श्री गणेश मूर्तीचे आगमन झाले. वाजत गाजत आगमन मिरवणूक काढत या मूर्ती विराजमान झाल्या. वायरी येथे संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून कुंभारमाठ येथे शासकीय तंत्रनिकेतन नजीक साजऱ्या होणाऱ्या माघी गणेश उत्सवातील वायरीचा राजा गणेश मूर्तीची तसेच मालवण येथील माघी गणेश चौक येथील श्री माघी गणेश मंदिरात होणाऱ्या उत्सवातील मालवणचा महागणपती या गणेश मूर्तीची एकत्रित काढलेली आगमन मिरवणूक लक्षवेधी ठरली. माघी गणेश मंदिरात आज गणेश दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. या मंदिरात उत्सवनिमित्त नित्य महाआरती, भजने, स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य स्पर्धा, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर कुंभारमाठ येथील वायरीचा राजा माघी गणेश उत्सवातही विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
तसेच मालवण मेढा येथील जय गणेश मंदिरात भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. या मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त मंदिराचा वर्धापन दिनही साजरा होत असून भाविकांनी गणेश दर्शनाबरोबरच महाप्रसादाचा लाभ घेतला. आडारी येथे नदी काठी वसलेल्या गणेश मंदिरातही भाविकांनी गर्दी केली होती. रेवंडी येथील श्री देवी भद्रकाली मंदिरातही माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा होत आहे. मालवणसह तारकर्ली, देवबाग व अन्य ठिकाणीही मोठ्या उत्साहात माघी गणेश जयंती उत्सव साजरा होत आहे.
यानिमित्त मालवण येथील भंडारी हायस्कूल आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणच्या उत्सवात अथर्वशीर्ष पठण करून श्री गणेशाची सेवा केली. तसेच उत्सवाच्या ठिकाणी सुमधुर, भक्तीगीते, भजने, आरती यांच्या सुरवटीमुळे वातावरण भक्तिमय व चैतन्यमय बनले आहे.