मालवण, दि.१३ फेब्रुवारी
मालवणमधील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी व तेथील परिसरातील नागरिकांसाठी लाईट, पाणी व प्रसाधन गृह अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी राजकोट वासियांच्या वतीने मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून या मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारवा लागेल असा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन महेश जावकर व नागरिकांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन सादर केले. मालवण राजकोट येथे नौदल दिनावेळी राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी करून तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे नवीन पर्यटन स्थळ विकसित झाले. मात्र सध्या याठिकाणी कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. लाईट व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी शिवरायांचा पुतळा अंधारात राहत असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच त्याठिकाणी प्रसाधन गृह नसल्यानेही पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत आहे. तसेच राजकोट किल्ला परिसरात लावलेली झाडे पाण्याअभावी सुकून जाण्याची भीती आहे. राजकोट भागात अगोदरपासूनच पाण्याची समस्या असून पुरेसे पाणी स्थानिक नागरिकांना व पर्यटन व्यवसायिकांना पण मिळत नाही. येथील पर्यटन भविष्यात वाढणार असल्याने राजकोट किल्ल्यासाठी पाच लाख लिटर पाणी साठवून ठेवणारी कायस्वरूपी टाकी राजकोट भागात बसविण्यात पाणी यावी, राजकोट भागातील पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी महेश जावकर व नागरिकांनी केली आहे.