१६ वर्षाखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये भंडारी हायस्कुलच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजेतेपद पटकावले

मालवण, दि.१३ फेब्रुवारी

सचिंद्र आयरे फाउंडेशन व रेवतळे महापुरुष कबड्डी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या १६ वर्षाखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये भंडारी हायस्कुलच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजेतेपद पटकावले तर टोपीवाला हायस्कुलच्या मुलींच्या संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. या अंतिम सामन्यामध्ये भंडारी हायस्कुलची श्रुतिका चव्हाण हिने अष्टपैलू खेळ करीत आपल्या संघाला एकहाती सामना जिंकून दिला.

या स्पर्धेमध्ये मुलींचे सहा संघ सहभागी झाले होते. यामध्ये भंडारी हायस्कुल, टोपीवाला हायस्कुल, जय गणेश, कन्याशाळा व इतर संघांनी सहभाग दर्शवीला होता. अंतिम सामन्यामध्ये सुरुवाती पासूनच भंडारी हायस्कुलच्या मुलींच्या संघाने आक्रमक खेळ करत टोपीवाला हायस्कुलच्या मुलींच्या संघाला पराभूत केले. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे सचिंद्र आयरे, प्रकाश साळुंखे, भंडारी हायस्कुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, बाबला पिंटो, नितीन हडकर, हरिश्चंद्र साळुंखे, बाबाजी बांदेकर, संजय शिंदे, रामभाऊ पेडणेकर, ललित चव्हाण, बंटी मांजरेकर, राखी हडकर, प्रिती बांदल यावेळी उपस्थित होते. तर पंच म्हणून विवेक नेवाळे, प्रथमेश आढाव, रिद्धी हडकर यांनी काम पाहिले.