व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळातील सहभाग महत्त्वाचा – राजन मुळीक

विद्या विहार आरोसचा पारितोषिक वितरण कार्यक्रम

बांदा ,दि.१४ फेब्रुवारी
आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्य आदर्शवत आहे. विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना रोख बक्षीस मिळावे म्हणून 5 हजार रुपये ठेव म्हणून देत आहे. उत्तम करिअर घडवण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता तर हवीच; पण विद्यार्थी दशेत व्यक्तिमत्त्वाचा परिपूर्ण विकास होण्यासाठी खेळातील सहभागही महत्त्वाचा आहे. खेळामुळे विद्यार्थी सशक्त बनतात. विद्या विहारमध्ये दर्जेदार शिक्षणाबरोबर वार्षिक क्रीडास्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन, जिल्हा परिषद माजी सदस्य राजन (राजू) मुळीक यांनी केले.
विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात श्री. मुळीक बोलत होते. व्यासपीठावर आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष बाळा परब, उपाध्यक्ष महादेव पांगम, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, सेवानिवृत्त शिक्षक गंगाराम खोत, संस्था सचिव शांताराम गावडे, खजिनदार बाळा मोरजकर, संचालक राजन मालवणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन परब, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, प्राध्यापक नितीन बागवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख मोहन पालेकर, शिक्षक विवेकानंद सावंत, सौ. कामत, न्हावेली माजी उपसरपंच चंद्रकांत दाभोलकर, आरोस माजी उपसरपंच सरिता नाईक, तसेच राजन परब, प्रवीण मेस्त्री, सोनाली मोरजकर, सौ. गावडे, सौ. आरोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे. स्पर्धेत अपयश आल्यास नाराज न होता पुन्हा चिकाटीने प्रयत्न करा यश आपोआपच मिळेल. स्पर्धा उपक्रमातून शाळेचे नावलौकिक करावे, असे आवाहन गंगाधर खोत यांनी केले.
क्रीडा पुरस्कारचे सूत्रसंचालन शिक्षक निलेश देउलकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत प्रोत्साहन दिले. दहावीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळालेल्या माजी विद्यार्थ्यांना तसेच विविध विषयात क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 1989-90 च्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यातून 15 हजार रुपये शाळेला दिले. गोवा येथील श्रीकृष्ण भक्त संजय शिंदे व शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत यांच्यातर्फे मान्यवरांना भगवतगीता प्रदान करण्यात आली. आदर्श शिक्षक पुरस्कार ज्येष्ठ शिक्षक विवेकानंद सावंत यांना, आदर्श विद्यार्थी पुरस्कार मयुरी महेश आरोसकर यांना तर आदर्श पालक पुरस्कार सरिता नाईक यांना प्राप्त झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मोहन पालेकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सदाशिव धुपकर यांनी तर अहवाल अनुष्का गावडे यांनी सादर केला. आभार मोहन पालेकर यांनी मानले.