सावंतवाडी दि.१४ फेब्रुवारी
सावंतवाडी सहकारी पतपेढीची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. पक्षीय राजकारण सहकारात न आणल्यामुळे अखेर समझोता होऊन विद्यमान पॅनेलच कायम ठेवण्यात आले. एका जागेसाठी निर्माण झालेला पेच अखेर मिटविण्यात आला. त्याचे श्रेय सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष श्री. संजू परब व उमेदवार श्री. गजानन सावंत यांना जाते.
विद्यमान संचालकांपैकी अॅड. गोविंद बांदेकर, श्री. रमेश बोंद्रे, श्री. उमाकांत वारंग, श्री. दत्ताराम सावंत, श्री. शरद सावंत, श्री. चंद्रकांत शिरोडकर, श्री. देवेंद्र तुळसकर, श्री. यल्लापा नाईक श्री. सदानंद जाधव, सौ. सीमा मठकर, सौ. मनिषा मिशाळ, सौ. किशोरी कुडतरकर, श्रीमती वैष्णवी बांदेकर, यांची नव्याने निवड करण्यात येत आहे.
सावंतवाडी सहकारी पतपेढीची स्थापना सावंतवाडी संस्थानच्या कारकिर्दीत तत्कालीन नृपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या प्रेरणेने दि. ३० जुलै १९३२ रोजी झाली. प्रारंभी ही संस्था सावंतवाडी संस्थानातील सेवकांची अर्थात नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी म्हणून स्थापन करण्यात आली होती. या सोसायटीचे अर्थात संस्थेचे पहिले अध्यक्ष सावंतवाडी संस्थानचे त्यावेळचे दिवाण कै. व्ही. बी. चंद्रचूड हे होते. सध्या भारत सरकारचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश श्री. डी. वाय. चंद्रचूड यांचे ते आजोबा होत. १९४७ मध्ये संस्थान विलिन झाल्याने १९५० साली या संस्थेचे सावंतवाडी सहकारी पतसंस्थेत रुपांतर झाले.
सन १९८४ पासून या संस्थेची निवडणूक होत आहे. जवळ जवळ ४० वर्षांनी या संस्थेची प्रथमच निवडणूक बिनविरोध झाली. महिलांना जास्तीत जास्त जागा मिळाव्यात या हेतूने आम्ही आमचे धोरण बदलून संस्थेमध्ये चार जागा या महिलांसाठी उपलब्ध करुन दिल्या.
सावंतवाडी संस्थेच्या कारभारावर सर्व सभासदांचा, ठेवीदारांचा आमच्यावर विश्वास असल्याचे दिसून येते, असा दावा संस्थेचे चेअरमन अॅड. गोविंद बांदेकर व माजी चेअरमन श्री. रमेश बोंद्रे यांनी केले.
संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनची निवड उद्या गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी श्री. आर. आर. आरावंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.