काजू बी ला प्रतिकीलो २०० रुपये भाव मिळाला पाहिजे म्हणून बागायतदार तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन १६ फेब्रुवारी रोजी

सावंतवाडी दि.१४ फेब्रुवारी 
काजू बी ला प्रतिकीलो २०० रुपये भाव मिळाला पाहिजे म्हणून बागायतदार तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी छेडणार आहेत या आंदोलनाला सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघांचा पाठिंबा आहे असे चेअरमन प्रमोद गावडे यांनी स्पष्ट केले. काजू बी ला प्रतिकीलो हमीभाव मिळावा असेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन काजुला हमीभाव मिळवून देण्यासाठी लढा देण्याचे ठरविले असून त्याची रूपरेषा तयार केलेली आहे. त्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार ऑफिस समोर एकाच दिवशी सर्व जिल्ह्यात धरणे आंदोलन कार्यक्रम, लोकप्रतिनिधींची संपर्क साधून योग्य न्याय न मिळाल्यास ताबडतोब लाक्षणिक उपोषण व त्यानंतरही दखल न घेतली गेल्यास आमरण उपोषण हे पर्याय यावेळी निवडले गेलेले आहेत.
सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ हा शेतकरी व बागायतदार यांचा आहे. सभासद देखील शेतकरी बागायतदार आहेत. त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र दरवर्षी काजू बी ला कमीत कमी भाव मिळाला आहे त्यामुळे शेतकरी बागायतदार एकत्रित येऊन लढा देत आहेत त्या आंदोलनाला शेतकरी संघ, संचालक मंडळ आणि सभासद यांचा पाठिंबा राहील असा विश्वास चेअरमन प्रमोद गावडे यांनी व्यक्त केला.
काजू शेती भातशेतीला पर्याय म्हणून अनेकांनी आर्थिक गुंतवणूक केली आहे पण बी ला भाव मिळाला नाही तर आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पर्याय नाही त्यामुळे भात पीका प्रमाणे काजू बी ला प्रतिकीलो हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी बागायतदार यांच्या मागणीला पाठिंबा आहे असे प्रमोद गावडे यांनी सांगितले. काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आंदोलन उभारत असल्याने शुभेच्छा दिल्या आहेत असे त्यांनी सांगितले.