शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींसाठी 427 कोटीचे टेंडर मंजूर

पाचशे बेडच्या हॉस्पिटलसह डिन बंगलो, हॉस्टेलचा समावेश

कणकवली दि.१४ फेब्रुवारी(भगवान लोके)

सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन अद्यायावत इमारतींसाठी पहिल्या टप्प्यात 427 कोटींचे टेंडर मंजूर झाले असून ते ऑनलॉईन अपलोड करण्यात आले आहे. पुढील महिन्यात 18 मार्चला ते उघडले जाणार आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, 500 बेडचे हॉस्पिटल, डिन बंगलो, मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल इमारती या कामांचा समावेश आहे. सुमारे 20 एकर जागेत हे सर्व साकारणार असून त्यासाठी अस्तित्वात असणार्‍या इमारती टप्प्याटप्प्याने पाडून नवीन इमारती दोन वर्षात पूर्ण केल्या जाणार असल्याची माहिती सा.बां. कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.
महाविकास आघाडी शासनाच्या काळात स्थानिक खासदार, आमदार यांच्या पाठपुराव्याने सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले होते. त्यानंतर हे महाविद्यालय सध्या असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्येच सुरु करण्यात आले. मात्र आता महायुती शासनाच्या काळात केंद्रीयमंत्री नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या वैद्यकीय महाविद्यालयाला नवीन इमारतींसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 427 कोटींच्या टेंडरला शासनाने मान्यता दिली आहे.
सुमारे 10 लाख स्क्वेअर फूटचे बांधकाम होणार असून वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाच्या अद्यायावत इमारती बांधल्या जाणार आहेत. यामध्ये फर्निचरसह इतर कामांचाही समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गात मंजूर झाल्यानंतर या महाविद्यालयासाठी अद्यायावत इमारतींची प्रतिक्षा होती. आता टेंडर मंजूर झाल्याने मार्चनंतर प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ अपेक्षित आहे. पुढील दोन वर्षात हे काम पूर्ण करून शासकीय महाविद्यालयाची प्रशस्त इमारत साकारणार असल्याचे श्री. सर्वगोड यांनी सांगितले.