सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या दोन वर्षात साधली मोठी प्रगती – अध्यक्ष मनीष दळवी

0

मार्च पर्यंत ६ हजार कोटींचा टप्पा गाठणार ; जिल्हा बँकेचे काम राज्यात आदर्शवत

सिंधुदुर्ग दि .१२ जानेवारी (भगवान लोके)

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मार्च पर्यंत ६ हजार कोटींचा टप्पा गाठणार आहे. दोन वर्षात ठेवींची टक्केवारी ७ टक्के पेक्षा वाढली आहे. २२०० कोटी वरून २९०० कोटी झाली आहे. कर्ज रक्कम ४१०० कोटी होती. ती ५५०० कोटी उलाढाल झाली आहे. यावर्षी राज्यातील जिल्हा सहकारी बँकांत ठेवी, कर्ज वितरण, कर्ज वसुली, नफा या सर्वच क्षेत्रात आपली जिल्हा बँक अग्रणी असणार आहे. त्या दुष्टीने आम्ही नियोजनात्मक काम करीत आहोत, जिल्हा बँकेचे काम राज्यात आदर्शवत आहे,अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालकांनी कारभार सुरू केल्यानंतर दोन वर्षे पूर्ण झाली. अध्यक्ष म्हणून मनीष दळवी आणि उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर यांनी १३ जानेवारी २०२२ रोजी पदभार स्विकारला होता. त्याला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक महेश सारंग, दिलीप रावराणे, बाबा परब, समीर सावंत, प्रकाश बोडस, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, व्हिक्टर डांटस, गजानन गावडे,विद्याधर परब, मेघनाथ धुरी, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, गणपत देसाई आदी संचालक उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष दळवी, सर्व साधारण आपल्या जिल्हा बँकेचा वार्षिक ठेवी वाढीचा रेषो तीन ते चार टक्के होता. मात्र, गेल्या दोन वर्षात तो सात टक्के पेक्षा पुढे गेला आहे. परिणामी २२०० कोटी असलेल्या ठेवी २९०० कोटी झाल्या आहेत. ही ठेव वाढ आम्हाला १२ टक्के करायची आहे. ठेव वाढ मध्ये आम्हाला राज्यात प्रथम यायचे आहे. कर्ज व्यवहार मोठी वाढ झाली आहे. दोन वर्षा पूर्वी ४१०० कोटी असलेली कर्ज रक्कम ५५०० कोटी झाली आहे.
ही कर्ज वितरण आकडेवारी आम्हाला सहा हजार कोटी एवढी नेवून राज्यात प्रथम राहायचे आहे.
आमच्या जिल्हा बँकेने राज्यात पहिल्यांदा डोअर स्टेप बँकिंग सुरू केले आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या या सुविधेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. व्यवसायात अधिकाधिक उंची गाठण्यासाठी बँकेने डिजीटल बँकिंग स्विकारले आहे. आपल्या बँकेने चॅटबोटचाही देशात पहिल्यांदा उपयोग सुरू केला आहे. जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरला आय एस आय मानांकन मिळाले, ही जिल्हा बँकेसाठी मोठी भूषणावह गोष्ट आहे. शेतकरी सक्षम करण्यासाठी दुग्धोत्पादन वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जिल्हा बँकेने दुग्ध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले होते. ते काही कारणाने अपयशी ठरले होते. मात्र, आता गोकुळ दूध संस्था आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आलेले दिसत आहे.
यासाठी आम्ही कर्ज प्रक्रिया सुलभ केली असून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यात लवकरच दोन हजार परराज्यातून दुधाळ जनावरे आणली जाणार आहेत. आता या व्यवसायात नवनवीन शेतकरी, उद्योजक उतरत आहेत. पुढील तीन वर्षात एक लाख लिटर दूध उत्पादनाचा उद्देश आम्ही यशस्वी करणार आहोत. जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांशी कनेक्ट होण्यासाठी मर्चंट ॲप ही योजना आणत आहोत. एकंदरीत सर्वच क्षेत्रात आपली जिल्हा बँक राज्यात पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे शेवटी अध्यक्ष दळवी यांनी सांगितले.

चौकट
जिल्हा बँकेत दोन तारण कर्ज योजना जास्त चालते. यासाठी एक ग्रॅम सोन्यासाठी ४२०० रुपये देतो. ती रक्कम आता ५ हजार रुपये करण्यात आली आहे. ठेवी व्याज दर ०.५ टक्के वाढवित ठेवी व्याज दर आठ टक्के पर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. पिंक रिक्षा कर्ज धरतीवर इलेक्ट्रिकल व्यावसायिक वाहन खरेदीसाठी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्याला व्याज माफीची योजना राबविण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी यावेळी दिली.