सर्वगोड यांचीसखोल चौकशीसाठी उद्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर आंदोलन

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन ; सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती

कणकवली दि.१४ फेब्रुवारी(भगवान लोके)

मालवणात नौसेना दिनानिमित्त अनेक विकास कामे झालीत,त्या कामांची आणि कणकवली रेल्वे स्थानक रस्ते सुशोभीकरण कामांसंदर्भात कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची चौकशी व्हावी. तसेच सर्वगोड यांच्या पद नियुक्तीनंतर सिंधुदुर्गात झालेल्या अन्य कामांची चौकशीसाठी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली १५ फेब्रुवारीला कणकवली येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.

सामाजिक कार्यकर्ते विनोद सांडाव प्रसाद गावड़े, दीपक गावडे, बाबल गावडे, राजेश टंकसाळी, आप्पा मांजरेकर अशिष सुभेदार, मंदार नाईक, संदीप लाइ अमित ईब्रामपूरकर व विल्सन गिरकर यांनी अधिक्षक अभियंत्यांना पत्र पाठवत हे आंदोलन जाहीर केले आहे.

नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने मालवणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागच्यावतीने काही कामे घाई गडबडीत उरकण्यात आली होती.हेलिपॅड व त्याला जोडणारे रस्ते तसेच राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी चबुतरा व राजकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण यांचा समावेश आहे. सदरील कामात भ्रष्टाचार झाला आहे.अभियंता श्री.सर्वगोड कणकवली कार्यालयात पदोन्नतीने रुजू झाल्यापासून कार्यालयात कमी व मुंबईमध्ये जास्त असतात. त्यामुळे ग्रामस्थ, सरपंच तसेच अन्य लोकप्रतिनिधी यांना भेटीसाठी उपलब्ध नसतात.ठेकेदारांना पूरक असा त्यांचा प्रशासकीय कारभार संशयास्पद वाटत असून सुट्टीचा दिवस सोडून अन्य वेळी कार्यालय प्रमुखाने कार्यालयात हजर राहणे बंधनकारक असून कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचा वावर पनवेल, कर्जत मुंबई या शहरात असल्याचे आमचे ठाम मत आहे. पूर्व कल्पना देऊनही प्रशासकीय कामासाठी बाहेर असल्याचे कारण देत भेट देण्यासाठी वारंवार टाळाटाळ करत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.