“समकालीन साहित्य आणि समाज” विषयावर गोगटे वाळके कॉलेजमध्ये 17 रोजी राष्ट्रीय चर्चासत्र

बांदा,दि.१५ फेब्रुवारी
येथील गोगटे — वाळके कॉलेज बांदा येथे येत्या शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी ‘ समकालीन साहित्य आणि समाज ‘ या विषयावर भाषा विभागाच्यावतीने एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी दिली.
भाषा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या चर्चासत्राचे उदघाटक म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे चेअरमन श्री डी .बी. वारंग हे उपस्थित राहणार आहेत तर या चर्चेसत्राचे बीजभाषक म्हणून मराठीतील ख्यातनाम साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक प्रवीण बांदेकर हे लाभणार आहेत. या राष्ट्रीय चर्चासत्रात मराठी , हिंदी , इंग्रजी व कोकणी भाषेतील विषयतज्ञ , संशोधक प्राध्यापक , विद्यार्थी संशोधक, प्रतिनिधी आदिजण उपस्थित राहणार आहेत .या राष्ट्रीय चर्चासत्रात महाराष्ट्र , गोवा, कर्नाटक ,केरळ, आदी विविध राज्यातील तज्ञ अभ्यासक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. हे चर्चासत्र एक दिवसीय असून दिवसभर विविध सत्रात विषयतज्ज्ञ व अभ्यासकांमध्ये सुसंवाद स्वरूपात चालणार आहे तसेच हे चर्चासत्र ऑनलाईन( आभासी पध्दतीने )व ऑफलाईन पद्धतीने चालणार आहे.& समकालीन साहित्यातून प्रतिबिंबित होणारे साहित्य समाजाला कसे दिशादर्शक ठरते,समकालीन साहित्याच्या जाणीवा आणि सामाजिकता , समकालीन प्रयोगशील साहित्य समाजाच्या जडणघडणीत कोणते योगदान देते, साहित्य आणि समाज यांचा सहसंबंध कसा प्रस्थापित होतो. यावर या चर्चासत्रात विचारमंथन अपेक्षित आहे. यावेळी साहित्य , शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यंवर या चर्चासत्राला भेट देऊन सुसंवादात सहभागी होणार आहेत .तरी अभ्यास, संशोधक , वाचक यांनी या चर्चासत्राला उपस्थित राहावे ,असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर व राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. दत्तगुरु जोशी यांनी केले आहे