देवगड,दि.१५ फेब्रुवारी
आम.नितेश राणे यांच्या सूचनेनुसार फुलकिडींचे नियंत्रण करण्याची उपाययोजना करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर आज दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी फणसे,ता.देवगड येथे कृषी विभाग व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा पिकावरील फुलकीड एकात्मिक व्यवस्थापन पथदर्शी प्रकल्पा अंतर्गत फुलकीड नियंत्रणाकरिता कीटकनाशक फवारणी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यासाठी आंबा उपसंशोधन केंद्र रामेश्वर येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ.अजय मुंज हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच तालुका कृषी अधिकारी देवगड कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी आंबा पिकावरील फुलकीड एकात्मिक व्यवस्थापन पथदर्शी प्रकल्पा अंतर्गत फुलकीड नियंत्रणाकरिता मार्गदर्शन वर्ग फणसे या गावात घेण्यात आले आहेत.
आजचे प्रायोगिक फवारणी प्रात्यक्षिक हे श्री. संतोष तुकाराम गावकर यांच्या आंबा बागेत घेण्यात आले. यावेळेस ब्रोफ्लानिलिड 300 G/L SC हा घटक असणारे एक्स्पोनस नावाचे किटकनाशक 1.70 ml ची मात्रा 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करण्यात येऊन पहिली फवारणी करण्यात आली. या फवारणी पूर्वी व फवारणी नंतर विशिष्ट कालावधीत आंबा मोहरावरील फुलकीडीचे प्रमाण ठराविक कालावधीत मोजण्यात येणार आहे.या प्रायोगिक तत्त्वावर फवारणीचे प्रात्यक्षिक करून फुलकिडीचे नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.