असलदेत लोखंडी साहित्य चोरताना ३ महिलांना पकडले…

तीन महिला चव्हाटा परिसरात संशयास्पद वावरताना आढळल्या; त्या महिलांना केलं पोलिसांच्या स्वाधीन

कणकवली दि.१५ फेब्रुवारी(भगवान लोके)

असलदे गावठण येथील चव्हाट्यावर तीन महिलांना लोखंडी साहित्य चोरी करताना पोलिस पाटील सावित्री पाताडे यांनी रंगेहाथ पकडले.चोरी करताना महिला पकडताना माहीती मिळताच संपूर्ण गावकरी जमा होऊन कणकवली पोलिसांना माहिती दिली.हि घटना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत वृत्त असे की ,आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास असलदे पोलिस पाटील सावित्री पाताडे या असलदे चव्हाट्याजवळून जात असताना तीन महिला चव्हाटा परिसरात संशयास्पद वावरताना दिसल्या.म्हणून पुढे जाऊन विचारपूस केली असता त्यांनी येथील लोखंडी साहित्य चोरी केल्याचे लक्षात आले.त्यामुळे त्यांना रोखून धरत ग्रामस्थांना माहीती देताच संपुर्ण गाव जमा झाला.अधिक चौकशी केली असता चोरलेले लोखंडी साहित्य जवळच्या झाडीत लपवून ठेवल्याचे कबूल केले.यानंतर कणकवली पोलिस स्थानकात माहिती देण्यात आली.

फंडपेटी फोडण्यात यांचाच हात

काही दिवसांपूर्वी येथील तीन मंदिरात दान पेट्या फोडण्यात आल्या होत्या.या दान पेट्या फोडण्यात यांचाच हात असावा असा संशय उपस्थित नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
या संशयित महिला विशेष करून दुपारच्या वेळात परिसरात भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने फिरत असतात.याचवेळी संधी साधून घर परड्यात माणसांची जाग नसल्याचे पाहून लोखंडी किंवा इतर साहित्य चोरून पसार होतात.अशा लोकांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे, असे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, पोलिस पाटील सावित्री पाताडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संशयित महिलांचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.