मालवण, दि.१५ फेब्रुवारी
मालवण तालुक्यातील देवबाग डिंगेवाडी येथील रामचंद्र मधुसूदन सामंत यांच्या घराला आज भल्या पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले या आगीत घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, तांबा, पितळीची भांडी, धान्य, कपडेलत्ते आणि इतर चिज वस्तू आगीत जळून भस्मसात झाल्याने श्री सामंत यांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग विजविताना संजय बाळकृष्ण लोणे हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे अद्यापही कारण स्पष्ट झालेले नाही.
यासंबंधीचे अधिक वृत्त असे की,
काल दिनांक १४ फेब्रुवारी रोजी रामचंद्र सामंत आणि त्यांची पत्नी सौ. गुलाब हे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झोपी गेले. आज गुरुवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास रामचंद्र यांच्या पत्नीला जाग आल्यानंतर तीला आगीची धग जाणवल्याने तिने तातडीने श्री. रामचंद्र सामंत यांना झोपेतून उठविले. यावेळी सामंत कुटुंबियांनी आरडाओरडा केल्याने सामंत यांच्या शेजाऱ्यांनी आग विझविण्यास प्रयत्न केले. यावेळी मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने देवबाग मध्ये धाव घेत घराला लागलेल्या आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ व अग्निशमन बंबाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
या आगीत सोन्या चांदीचे दागिने तसेच तांब्या पितळीची भांडी, श्री देव विश्वेश्वर देवस्थानचे दागिने, दशावतारी कपडे, भांडीकुंडी, जमिनीची कागदपत्रे, अन्न धान्य, व इतर चिज वस्तू असे सुमारे वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
आग लागल्याचे समजताच महसूल आणि पोलीस प्रशासनाने धाव घेतली. यावेळी देवबागचे तलाठी नवीन राठोड, देवलीचे तलाठी श्री. राठोड, पोलीस पाटील भानुदास येरागी, तलाठी रविकांत तारी, ग्रामसेवक ए. जी. जोशी, सरपंच उल्हास तांडेल, उपसरपंच ताता बिलये, अपर्णा धुरी, अवी सामंत, निलेश सामंत, रमेश कद्रेकर, एन्जॉय तूळसकर, किशोर मयेकर, नंदू कुपकर यांनी धाव घेत पाहणी केली. व नुकसानीचा पंचनामा केला.