आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक भाविकांना सुविधा द्या-पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी, दि .१५ फेब्रुवारी

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मालवण तालुक्‍यातील आंगणेवाडी येथील श्री. भराडी देवी वार्षिक जत्रौत्‍सव आणि देवगड तालुक्‍यातील कुणकेश्वर श्री. देव स्वयंभू देवाचा वार्षिक जत्रौत्‍सव नियोजनाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, कुडाळ उपविभागीय अधिकारी विशाल खत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, श्री मठपती, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी भगवान पवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, यात्रेदरम्यान भाविकांना सर्व सुविधा मिळणे आवश्यक आहे. गावांतील सर्व जलस्त्रोताची पाहणी करावी, देवस्थान परिसरामध्ये असलेल्या बोअरवेल व विहिरी यातुन पाण्याचा साठा उपलब्‍ध होऊ शकेल का याचे नियोजन करावे,जत्रेपूर्वी दोन दिवस व जत्रेनंतर दोन दिवसांनी मंदिर परिसर स्वच्छ करण्याकरिता स्वच्छता मोहिमांचे आयोजन करावे, मंदिर परीसरापासून किंती अंतरावर स्‍टॉल व दुकाने उभारले जाणार आहेत हे नियोजन करावे, प्रत्येक स्‍टॉल वर अग्निरोधक यंत्रणा (पाण्याची सोय, वाळूच्या बादल्या ई.) बसवुन घेण्‍यात यावेत, पार्किग करण्यासाठी आवश्‍यक तेवढ्या प्रमाणात जागा उपलब्‍ध करावी असेही ते म्हणाले.

कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले , महत्वाच्या ठिकाणी पोलीस चौक्‍या उभाराव्यात, वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे, देवस्‍थान परिसर, मंदिराचे मार्गाची तपासणी करावी, वाहतूक नियंत्रण व नियमन करावे, मंदिर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ठेवावीत, त्यामध्ये पुरेशा प्रमाणात प्राणवायू, जीवरक्षक औषधे व सुविधा असलेल्‍या रुग्‍णवाहिका वैद्यकिय पथकाकडून सुसज्ज ठेवाव्यात, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय पथक, अतिरिक्त डॉक्टर, बेड रुग्णवाहिका यांची व्यवस्था करावी असेही ते म्हणाले.

यात्रेदरम्यान भाविकांना पुरेशा प्रमाणात एसटीच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, रेल्‍वे स्‍थानकावर कक्ष कार्यान्‍वीत करण्‍याबरोबरच रेल्‍वेच्‍या वेळापत्रकाप्रमाणे एसटी बसेसची व्‍यवस्‍था करावी, आंगणेवाडीकडे जाणा-या सर्व रस्ते सुस्थितीत असतील याबाबत उपाययोजना करावी, रस्त्यावर आवश्यक त्‍या ठिकाणी दिशा दर्शक फलक, रिफ्लेक्टर लावावेत, विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच देवस्‍थान आवारात स्‍ट्रीट लाईट तपासणी करावी, मंदिर परिसरात पुरेशा प्रमाणात स्‍वच्‍छता गृहे उपलब्‍ध करणेत यावीत. दोन्ही बाजूच्या पार्किंगच्या ठिकाणी बायो टॉयलेट उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व शासकीय विभागांच्या विभागप्रमुखांची बैठक, ‘जल जिवन मिशन’ व जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा, सार्वजनिक बांधकाम विभाग,रेल्वे स्टेशन सुशोभिकरण प्रकल्प आढावा, कृषी विभाग, वाळू धोरण व सिंधुदुर्ग जिल्हा महसूल यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा, पोलीस यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक देखील घेतली.