बांदा,दि.१६ फेब्रुवारी
रोणापाल – आरोसकर टेंब येथील विश्राम गोविंद पालव (३०) या तरुणाने राहत्या घराच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. बांदा पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत विश्राम हा वृद्ध आई समवेत राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो अविवाहित होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तो घरी आला. त्यावेळी त्याची आई शेजारच्या घरी होती. ती घरी आली असता विश्राम अंगणात पडलेला दिसून आला. प्रथम तीला अति दारू प्राशनाने तो पडला असावा असे वाटले. तीने नजीक जाऊन पाहिले असता विश्रामच्या गळ्यात नायलॉनची दोरी दिसली. तीने आरडाओरड केल्यानंतर स्थानिक जमा झाले.
पोलीस पाटील निर्जरा परब यांनी बांदा पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक झांजूर्णे यांनी घटनेचा पंचनामा केला. आज सकाळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी उपसरपंच कृष्णा परब, राजन परब, नीलेश नाईक आदींसह ग्रामस्थांनी सहकार्य केले.