मालवण,दि.१६ फेब्रुवारी
मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या संगीत अलंकार गायन या परिक्षेत मालवण येथील प्रथितयश वकील व सिंधुदुर्ग जिल्हयातील सुप्रसिद्ध गायक अँड दिलीप प्रभाकर ठाकूर यांनी कोल्हापुर केंद्रातून प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकाविला आहे त्यांना या दोन्ही परीक्षेकरीता केळुस येथील उत्तम तबलावादक श्री. अरुण केळुसकर यांनी साथ दिली.
ऍड. दिलीप ठाकूर यांना लहानपणापासून गायनाची आवड असल्याने त्याचे शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण प्रथम मालवण मधील कै. पांडुरंग कान्होबा पेंडूरकर त्यानंतर कट्टा येथील श्री. वामनराव काराणे व पं. श्रीपाद बुवा माडये यांचेकडे झाले. त्यानंतर कोल्हापूर येथील कै. आप्पासो देशपांडे तथा नूतन गंधर्व, प. अरुण कुलकर्णी व त्यानंतर पं. वसंतराव काडणेकर, गोवा यांचेकडे शिक्षण घेतले असून गेली काही वर्षे ते पं. अजित कडकडे यांचेकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण चालू आहे.
संगीत अलंकार प्रथम परीक्षेकरीता त्यांना रत्नागिरी येथील सौ. मुग्धा भट – सामंत व संगीत अलंकार द्वितीय परीक्षेकरीता मडगाव, गोवा येथील डॉ. रामराव नायक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. आपला वकिली व्यवसाय व सर्व जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी हे सुयश संपादन केले आहे.
सेवानिवृत्त तहसीलदार श्री. प्रभाकर ठाकूर व सेवानिवृत्त शिक्षिका सौ. निलीमा ठाकूर यांचे ऍड. दिलीप ठाकूर हे चिरंजीव असून आपल्या या यशात आई वडील व पत्नी सौ. सारिका ठाकूर हिचा देखील वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत संगीत सेवा करीत राहणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे