मालवण,दि.१६ फेब्रुवारी
आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे कारण आमच्यावेळी साठ सत्तर टक्के गुण मिळविणारे क्वचितच होते परंतु आता शंभर टक्के गुण मिळविणारे शेकडो विध्यार्थी आहेत म्हणून आता टक्केवारीला महत्व राहिलेले नाही तर गुणवत्तेला महत्व आहे. आदर्श विध्यार्थी बनत असताना तुमचा शैक्षणिक दर्जा कसा उंचावला जाईल या दृष्टीकोनातून शैक्षणिक दर्जा उंचावून स्पर्धात्मक युगामध्ये आपले विध्यार्थी कसे झळकतील जेणेकरून त्यांच्या आयुष्याची जडण घडण चांगल्या पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून शिक्षकांनी आणि संस्था चालकांनी अधिक प्रयत्न करायचे असतात आणि तशा प्रकारचे प्रयत्न आज चौके हायस्कूलचे संस्थाचालक आणि शिक्षक करीत आहेत असे गौरवोद्गार रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांनी चौके येथे बोलताना केले
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चौके येथील भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालयाच्या उभारण्यात आलेल्या सभागृहाचे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, हरी खोबरेकर, भाई गोवेकर, दिपा शिंदे, निनाक्षी शिंदे, बिजेंद्र गावडे, सरपंच गोपाळ चौकेकर, उपसरपंच पी के चौकेकर, मंदार गावडे, अभिजित पाटील, संजय गावडे, मुख्याध्यापिका रसिका गोसावी, रामाकांत चौकेकर, बाळा गावडे, धुलाजी चौकेकर, अर्जुन गावडे, राजन सावंत हे यावेळी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका रसिका गोसावी मॅडम यांनी केले.
यावेळी खासदार राऊत म्हणाले,
आज शाळांची विध्यार्थी संख्या कशी वाढवायची ही चिंता सर्वच शिक्षण संस्था चालकांना आहे इथल्या शिक्षकांना जसे घरोघरी फिरावे लागते त्याचप्रमाणे मुंबई मधील शिक्षकांना देखील घरोघरी फिरावे लागते. परंतु या शाळेच्या संस्था चालकांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या शाळेतल्या शिक्षकांनी या शाळेचा शैक्षणिक दर्जा फार चांगल्या पद्धतीने उंचावला आहे यामुळेच या कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तुम्हा विध्यार्थ्यांसाठी भव्य असे सभागृह बनविले आहे. आज शाळांना अनेक अडचणी असताना शाळांना अनेक समस्या असतात त्या सोडविण्यासाठी आमदार नाईक हे पुढे आलेले आहेत मी देखील आहेच. या शाळेच्या तसेच विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे गरजेचे आहे ते देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आमदार नाईक यांच्या प्रयत्नातून गावाचे ग्रामपंचायत कार्यालय उभ करण्यासाठी आज भूमिपूजन करण्यात आले. असे यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी चौके पंचक्रोशीतील अनेक मुले याच शाळेत येतात. खरतर अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाल्या आहेत पण तरीही या शाळेमध्ये विध्यार्थी संख्या जास्त आहे हे उल्लेखनीय आहे. या शाळेसाठी जे जे करावयाचे आहे ते काम संस्थेचे अध्यक्ष बिजेंद्र गावडे करत असतात. आज विध्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. ज्याप्रकारे तलाठी बनण्यासाठी स्पर्धा होतात त्याचप्रमाणे एखाद्या ड्रायव्हर पदाच्या भरतीसाठी देखील स्पर्धा परीक्षा असतात. यापुढे कोण कोणाचा मुलगा आहे हे न बघता त्याची शैक्षणिक गुणवत्ता किती आहे यावर अवलंबून आहे. सतत वाचन केले पाहिजे विविध विषयांवर बोलले पाहिजे त्यातील ज्ञान वाढविले पाहिजे. तुमच्या शाळेला ज्या गरजा असतील त्या तुम्ही स्वखुशीने आम्हाला सांगा आम्ही ते पूर्ण करू असेही ते म्हणाले
शेवटी आभार बिजेंद्र गावडे यांनी मानले.