शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीदिनी रॅलीचे आयोजन

वरवडे ते कणकवली काढण्यात येणार भव्य दुचाकी – चारचाकी रॅली

कणकवली दि.१७ फेब्रुवारी(भगवान लोके)

शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे वरवडे ते कणकवली अशा दुचाकी – चारचाकी रॅलीचे आयोजन सोमवार, १९ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. रॅलीचे हे सातवे वर्ष आहे.

रॅलीचा प्रारंभ वरवडे येथील पुल येथून सकाळी १० वा. होणार आहे. तेथून रॅली कुंभारवाडीमार्गे कलमठ बाजारपेठ येथे दाखल होईल. तेथे आयोजित शिवजयंती उत्सवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर रॅली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात येईल. तेथून बाजारपेठमार्गे जाऊन शिवाजीनगर येथे शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल. पुढे नरडवे रस्तामार्गाने सर्व्हिस रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचे आगमन होईल. तेथे शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप होईल. त्यानंतर शिवजयंती उत्सव समितीतर्फे तालुक्यातील विविध ठिकाणच्या शिवजयंती उत्सवांना भेट देण्यात येणार आहे. रॅलीमध्ये शिवप्रेमी, दुचाकी, चारचाकी वाहनधारक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले (९१३७८३९५३२) यांनी केले आहे.