स्पर्धात्मक परीक्षेला बसून शैक्षणिक वाटचालीत आपली प्रगती साधताना आपल्याबरोबरच आपल्या शाळेचे आणि तालुक्याचे नाव उज्वल करावे-श्री. साबाजी करलकर

मालवण,दि.१७ फेब्रुवारी
शालेय जीवनात होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षामुळे मुलांच्या बुद्धीचा कस लागत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशाप्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षेला बसून शैक्षणिक वाटचालीत आपली प्रगती साधताना आपल्याबरोबरच आपल्या शाळेचे आणि तालुक्याचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन
भंडारी एज्यु. सोसा.(मालवण) मुंबईचे ऑनरारी जनरल सेक्रेटरी श्री. साबाजी करलकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी एज्यु. सोसा. ( मालवण ) मुंबई आणि भंडारी हायस्कुल दहावी बॅच १९८५ – ८६ व बारावी बॅच १९८७ – ८८ यांच्या वतीने गेले चार दिवस मालवणच्या भंडारी हायस्कुल मध्ये सुरु असलेल्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिराचा समारोप आज झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी वामन खोत, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे ए. आर. पाटील, देवेंद्र गोलतकर, मनाली वेंगुर्लेकर, सागर मिसाळ, माजी विद्यार्थी प्रफुल्ल देसाई, सौ. संगीता शिरवाडकर, सुभाष मांजरेकर, दिलीप देवगडकर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी श्री. प्रफुल्ल देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी श्री. खोत सर यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन करून भंडारी हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विद्यार्थ्यांची प्रगती होण्याच्या दृष्टीने आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी जे दिशादर्शक काम केले आहे ते वाखाण्याजोगे आहे असे सांगितले
तर या मार्गदर्शन वर्गास सहभागी झालेल्या भंडारी हायस्कुल मालवणच्या कौस्तुभ गावडे, टोपीवाला हायस्कुलच्या सोहम गवाणकर या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन वर्गाबाबत मत प्रदर्शित करताना अशाप्रकारची स्पर्धात्मक परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग आवश्यक असल्याचे सांगून आयोजकांचे आभार मानले. चार दिवस चाललेल्या या मार्गदर्शन वर्गाचा मालवण शहर आणि परिसरातील इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी मधील सुमारे १३५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.