कनेडी येथे बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी शुभेच्छा कार्यक्रम
कणकवली दि .१७ फेब्रुवारी(भगवान लोके)
कोकणची भूमी ही शूर नररत्नांची भूमी आहे .संतांची भूमी आहे .या भूमीने अनेक नररत्ने या देशासाठी दिलेले आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि आपल्या भावी जीवनाची वाटचाल करा त्याचबरोबर नेहमी सत्याची कास धरावी ,येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जावे, आपल्या आई-वडिलांबरोबरच या कोकण भूमीचे नाव उज्वल करा,असे आवाहन कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी श्री.मोहनराव मुरारीराव सावंत जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स श्री. तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी शुभेच्छा कार्यक्रम प्रशालेच्या ज्ञानदीप सांस्कृतिक भवनात पार पडला.यावेळी ते बोलत होते.
श्री.सर्वगोड म्हणाले, बारावीच्या विद्यार्थ्यांना अपयशाने खचून जाऊ नका .संत ज्ञानेश्वर आणि कोमल हृदयाचे साहित्यकार परमपूज्य साने गुरुजी यांनी विश्वबंधुत्वाची कामना केली त्यांच्या विचारांचे अनुसरण करताना हे विश्वसुंदर बनवण्यासाठी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करा. थोरामोठ्यांचा माणसं मान करा. आणि ज्या शाळेने तुम्हाला मोठे बनवण्यासाठी प्रयत्न केलेत त्या शाळेला कधीही विसरू नका,असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. आपले सुंदर व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ज्या शाळेने मोलाचा वाटा उचलला ,आपल्याला संस्कार दिले, मोठे झालात की या शाळेचे ऋण फेडण्याचा निश्चितच आपण प्रयत्न करावा. हे वय संस्कारक्षम वय आहे . या वयात व्यसनांपासून दूर राहिलात तर नक्कीच आपल्या पुढील जीवनात यशस्वी होऊ शकाल असा शुभ संदेश दिला.
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा कार्यक्रमासाठी व्यासपीठावर कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस श्री.शिवाजी सावंत ,शालेय समितीचे चेअरमन श्री.आर एच सावंत सर खजिनदार श्री. गणपत सावंत गुरुजी शालेय समितीचे सदस्य सन्माननीय बावतीस घोन्सालवीस ,प्रशालेचे प्राचार्य श्री सुमंत दळवी ,पर्यवेक्षक श्री.बी एम बुरान उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकरावी सायन्सच्या विद्यार्थिनी कुमारी सानिका काळसेकर व कुमारी श्रुती तावडे यांनी केले .तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले भावस्पर्शी विचार व्यक्त करताना या प्रशालेच्या ऋणात आपण सदैव राहू असे सांगितले.