कणकवली दि.१७फेब्रुवारी (भगवान लोके)
नाटळ गावचे ग्रामदैवत व नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिध्द श्री देव रामेश्वर मंदिरातील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह रविवार 18 फेब्रुवारी ते सोमवार 26 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. हरिनाम सप्ताहनिमित्त मंदिर परिसरात रंगरंगोटी करण्यात आली असून हरिनाम सप्ताहाचे सुयोग्य नियोजन देवस्थान प्रमुख व ग्रामस्थांनी केले आहे.
वास्तुशिल्प कलेचा अद्भुत नमुना म्हणून नाटळचे ग्राममंंदिर प्रसिध्द आहे. शिव पिंडीच्या आकारातील हे शमंदिर गर्दवनराईत व नदीच्या काठावर वसलेले असून मंदिर धार्मिक पर्यटनासाठीही प्रसिध्द आहे. या मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताहाला ‘मध्वनवमी’पासून प्रारंभ होतो. हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांच्या सेवेसाठी वाहनतळ, पाणपोई, दर्शन रांग आदींचे नियोजन करण्यात आले आहे. हरिनाम सप्ताहनिमित्त थाटण्यात येणार्या व्यावसायिकांना दुकाने थाटण्यासाठी नियोजनबध्द व्यवस्था करण्यात आली आहे. रविवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. घटस्थापनेने या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर पुढील सात दिवस मंदिर परिसर व अवघा नाटळ गाव हरिनामाने दुमदुमणार आहे. हरिनाम सप्ताह काळात श्री रामेश्वराच्या नित्यपूजेबरोबरच हरिपाठ, ग्रामस्थांची भजने, चित्ररथ, ढोलवादन, लेझीम खेळ, दिंड्या आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या हरिनाम सप्ताहात जिल्हाभरातील तसेच रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई येथील नामांकित भजनी बुवा आपली भजन कला सादर करतात. हरिनाम सप्ताहसाठी गावातील चाकरमानी ग्रामस्थ दाखल होण्यास सुरूवात झाली असून एरव्ही बंद असलेली घरे उघडू लागली आहेत.
शनिवार 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. घटविसर्जन व त्यानंतर गार्हाणी, नवस, तीर्थप्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहे. यानंतर पुढील 7 दिवस अखंड हरिनामाबरोबरच हरिपाठ, दिंड्या, चित्ररथ, ढोलवादन, लेझीमनृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत. हरिनाम सप्ताहाच्या तिसर्या दिवसापासून म्हणजेच माघी एकादशीपासून रोज रात्री श्री देव रामेश्वर- माऊलीच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा होणार आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 हरिनाम सप्ताह निमित्त स्थापित घटाचे विर्सजन व तीर्थ प्रसाद वाटप होणार आहे. तर सोमवार 26 फेब्रुवारी रोजी दुपारी हरिनाम सप्ताह निमित्त समाराधना अर्थात महाप्रसादाचा कार्यक्रम व रात्री दशावतार नाटट्यप्रयोग होणार आहे. या हरिनाम सप्ताहास उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान प्रमुख लवू( बबन) सावंत, आप्पाजी सावंत व नाटळ ग्रामस्थांनी केले आहे.