एकांकिका स्पर्धांमधून उत्कृष्ट कलाकार निर्माण होतील-रमाकांत खलप

0

वेंगुर्ला,दि.१२ जानेवारी
मी कलाकार आहे अशी उर्मी देणारा प्रदेश म्हणजे कोकण. नाट्य रंगमंचाने माणसाला तगवल आहे. माणसाला जगविण्याची ताकद रंगमंच देतो. एकांकिका स्पर्धांमधून उत्कृष्ट कलाकार निर्माण होतील. ‘कलावलय‘ सातत्याने २७ वर्षे घेत असलेल्या या नाट्य चळवळीबद्दल त्यांचे कौतुक करतो. अशा एकांकिकांमधून कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट कलेचा झेंडा रोवावा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री तथा गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप यांनी खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहामध्ये कलावलय आयोजित व बी.के.सी.असोसिएशन मुंबई पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर

स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला आज १२ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री तथा गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप व सिधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, बी.के.सी.असोसिएशनचे अध्यक्ष सतिश डुबळे, कलावलय संस्थेचे पदाधिकारी सुरेंद्र खामकर, संजय पुनाळेकर, दिगंबर नाईक, सुनिल रेडकर, स्पर्धेचे परिक्षक आनंद म्हस्वेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री.खलप म्हणाले की, कलेच्या माध्यमातून भाषा जोपासण्याचा प्रयत्न होत आहे. गावागावातील, वाड्यावाड्यांतील भाषांच्या रूपाचे आपण एकत्रिकरण केले तर एक सांस्कृतिक धन निर्माण होईल असे स्पष्ट केले.

कलावलयने राबविलेल्या २७ वर्षांच्या चळवळीचे कौतुक म्हणून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या उपक्रमास आपला सहभाग दर्शविला आहे. समाजातील लोक समाधानी कसे होतील यासाठी आपले प्रयत्न आहेत. यापुढेही कलावलय संस्थेच्या मागे आपण ठामपणे उभा राहू अशी ग्वाही सचिन वालावलकर यांनी दिली. कलावलयतर्फे रमाकांत खलप तसेच सिधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपदी सचिन वालावलकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले.

फोटोओळी-वेंगुर्ला येथील स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन रमाकांत खलप व सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले.